हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील बजरंग चौक परिसरात असलेल्या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात विजयादशमीनिमित्त ब्रह्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि धार्मिक उत्साहात संपन्न झाला. दसऱ्याच्या मंगलपर्वावर भगवान श्री बालाजींसह मंदिरातील विविध देवी-देवतांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अभिषेक, पूजन आणि आरतीने मंदिर परिसर भक्तिमय झाला.


प्राचीन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी – विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू होती. शेकडो वर्षांचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या या पुरातन मंदिरात भगवान श्री व्यंकटेश बालाजींसह सर्व देवी-देवतांचे दर्शन घेण्यासाठी शहरातील तसेच परिसरातील भाविकांनी हजेरी लावली. भक्तांनी श्रद्धापूर्वक दर्शन घेत सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली.
कालिंका माता मंदिराच्या मिरवणुकीने वाढली उत्सवाची रंगत

सायंकाळी कालिंका माता मंदिरातून निघालेली मिरवणूक बालाजी मंदिर परिसरात दाखल होताच दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणखी वाढली. विजयादशमीचा उत्साह, धार्मिक परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला. मिरवणुकीच्या आगमनाने मंदिर परिसरातील उत्सवी वातावरण अधिकच भक्तिमय झाले.


या धार्मिक सोहळ्यादरम्यान पुरोहित कांता गुरु वाळके आणि गजू गुरु वाळके यांच्या हस्ते भाविकांना बुंदीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. भाविकांनी दर्शनासह प्रसादाचा लाभ घेतला. विजयादशमीच्या पावन पर्वावर पार पडलेल्या या ब्रह्मोत्सवामुळे हिमायतनगरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले.



प्राचीन मंदिराचा वारसा, भगवान श्री व्यंकटेश बालाजींवरील भाविकांची श्रद्धा आणि विजयादशमीच्या निमित्ताने झालेली भक्तांची गर्दी यामुळे बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

