हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| दुष्काळाच्या झळा, हाताला काम करूनही पदरात न पडणारे मानधन आणि तोंडावर आलेली दिवाळी… अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शालेय पोषण आहार कामगारांचा संयम अखेर सुटला आहे. मागील सहा महिन्यांपासून मानधन थकल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी कॉम्रेड दिगंबर काळे आणि वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.


शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कामगारांना सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत काम करूनही मोबदला मिळत नसल्याने कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याची व्यथा आंदोलनकर्त्यांनी मांडली.


दिवाळी तोंडावर, पण कामगारांच्या घरात अंधार! दसरा नुकताच पार पडला असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वसामान्य कुटुंबे सणाच्या तयारीत असताना शालेय पोषण आहार कामगारांच्या घरात मात्र आर्थिक संकटाचे सावट आहे. सहा महिन्यांचे मानधनच मिळाले नसल्याने मुलांचे कपडे, फराळ, घरखर्च आणि सणाच्या आवश्यक वस्तूंची खरेदी करायची तरी कशी, असा प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकला आहे. ‘विद्यार्थ्यांना पोषण आहार देणाऱ्या कामगारांच्या घरातच उपासमारीची वेळ; मग त्यांची दिवाळी गोड कशी होणार?’ असा सवाल या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
दोन-चार दिवसांची मुदत; अन्यथा रुमणे मोर्चा! थकीत मानधनाचा प्रश्न येत्या दोन ते चार दिवसांत मार्गी लावून कामगारांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. निर्धारित मुदतीत मानधन न मिळाल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर ‘रुमणे मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशाराही कॉम्रेड दिगंबर काळे आणि वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व पुरुष कामगार सहभागी झाले होते. मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांचा उदरनिर्वाह आणि सणासुदीचा खर्च भागविण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, आता तरी शिक्षण विभागाने या मागणीची दखल घेऊन तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी होत आहे.




सहा महिने काम करूनही मानधन मिळत नसेल, तर या कामगारांनी कुटुंबाचा संसार चालवायचा तरी कसा? प्रशासनाने दिवाळीपूर्वी मानधन देऊन या कष्टकरी कामगारांना दिलासा देणार की त्यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

