नांदेड| माहूरगडावरील शारदीय नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून, दि. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान होणाऱ्या उत्सवात भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.


नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली माहूर येथे यात्रा नियोजनाची आढावा बैठक घेण्यात आली. सहधर्मादाय आयुक्त तथा संस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा हिराबाई शेळके आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, पाणी, वीज, स्वच्छता, पार्किंग आणि दर्शन व्यवस्था यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


१२० एसटी बसेसची व्यवस्था
माहूरगडावर येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १२० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी ५०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात येणार असून, गर्दी नियंत्रण, दर्शन रांगा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.



वनक्षेत्रात सुरक्षा पथके
माहूरगड परिसरातील जंगल भागात भाविकांना वन्यप्राण्यांपासून सुरक्षितता मिळावी, यासाठी वन विभागाची गस्त वाढविण्यात येणार आहे. आवश्यक ठिकाणी विशेष सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून बंद असलेले पथदिवे नवरात्रोत्सवापूर्वी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य यंत्रणाही सज्ज
भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील ४० पैकी २० खाटा यात्रा व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुरेसा औषधसाठा आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार असून, दत्तशिखर, अनुसया माता आणि रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी आरोग्य पथके व रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.
पाणी, स्वच्छता आणि महाप्रसादाची व्यवस्था
संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज आणि सुलभ दर्शन रांगा यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. परशुराम मंदिर परिसरात भाविकांसाठी महाप्रसाद, साबुदाणा खिचडी व फळांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
नगरपंचायतीतर्फे दत्त चौक येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून, पाणी, पथदिवे आणि शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दत्तशिखर संस्थानतर्फेही पाणी, स्वच्छता, वीज, महाप्रसाद आणि संस्थानच्या जागेत मोफत वाहनतळाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. महावितरणकडून नवरात्रोत्सव काळात अखंडित वीजपुरवठा करण्याची ग्वाही देण्यात आली.
दोन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या आरोग्य, सुरक्षा, वाहतूक आणि अन्य आवश्यक सुविधांसाठी विविध विभागांचे दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, आढावा बैठकीला पुरातत्त्व विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमुखांची अनुपस्थिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गांभीर्याने नोंदवून घेतली. भाविकांनी प्रशासनाच्या सूचना व शिस्तीचे पालन करून निर्धास्तपणे माहूरगडावर यावे आणि श्री रेणुकामातेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासन व संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

