नांदेड, अनिल मादसवार | गणेशोत्सव आणि महालक्ष्मी पूजनाचा धार्मिक कालावधी असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे योग्य नाही. त्यामुळे नांदेड शहरातील ज्ञानमाता विद्या विहार इंग्लिश मीडियम स्कूलने जाहीर केलेला परीक्षा कार्यक्रम तातडीने बदलावा, अशी मागणी भाजपचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर बालासाहेब देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


गणेशोत्सव आणि महालक्ष्मी पूजन हा अनेक कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा धार्मिक कालावधी आहे. या काळात विद्यार्थी आणि पालक पूजन, धार्मिक विधी तसेच उत्सवाच्या तयारीत सहभागी असतात. अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्यासोबतच पालकांनाही मोठी अडचण निर्माण होणार असल्याचे देशमुख यांनी निवेदनात नमूद केले आहे.


धार्मिक सणांच्या काळात विद्यार्थ्यांवर परीक्षेचा अतिरिक्त ताण का? असा सवाल उपस्थित करत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि पालकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन परीक्षांच्या तारखा बदलण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.



भविष्यात गणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन यांसह प्रमुख धार्मिक सणांच्या कालावधीत परीक्षा किंवा महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम निश्चित करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या भावना विचारात घ्याव्यात, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन परीक्षा कार्यक्रमात बदल करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा किशोर देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे.

