नांदेड| जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक भौतिक सुविधांची पूर्तता तातडीने करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी शिक्षण विभागाला दिले.



जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांबाबत प्राप्त तक्रारी तसेच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रत्यक्ष व ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यावेळी शाळांमधील जीर्ण वर्गखोल्या, दुरुस्तीची कामे आणि नवीन बांधकामे यांचा आढावा घेत महेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.



शाळांमध्ये स्वच्छता राखण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. शाळा परिसरातील साचलेले पाणी व अस्वच्छता तातडीने दूर करावी. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशामक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी तसेच नादुरुस्त अग्निशामक यंत्रांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.



याशिवाय फेसाई रजिस्ट्रेशन, अंगणवाड्यांसाठी अतिरिक्त वर्गखोल्यांची उपलब्धता, EHRS प्रणालीमध्ये सेवाविषयक बाबी अद्ययावत करणे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची NPS खाती १०० टक्के पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. शाळांच्या थकीत वीजबिलांबाबत आवश्यक कार्यवाही करावी, उपलब्ध पुस्तकांचा विद्यार्थ्यांकडून नियमित वापर सुनिश्चित करावा, मुलींच्या स्वच्छतागृहांमध्ये पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी तसेच शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना तसेच त्यांच्या पत्रव्यवहाराची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर वेळेत उपाययोजना कराव्यात, असे महेश पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे आणि त्यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या प्राधान्यक्रमाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कामांचा प्राधान्यक्रम वस्तुनिष्ठ आणि विद्यार्थी केंद्रित असावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनीही शिक्षण विभागाला विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
बैठकीस महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, समग्रचे बांधकाम कार्यकारी अभियंता उबेद खान, वरिष्ठ सहाय्यक धनंजय गुम्मलवार यांच्यासह समग्र योजनेचे कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखही बैठकीत सहभागी झाले.

