Homeनांदेडपत्रकारितेची विश्वासार्हता टिकविणे हीच लोकशाहीची खरी ताकद : विलास बडे

पत्रकारितेची विश्वासार्हता टिकविणे हीच लोकशाहीची खरी ताकद : विलास बडे

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या नांदेड येथील कॅडर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, प्रतिनिधी| सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकारितेने केले आहे. मात्र, सामान्य माणसाचा पत्रकारितेवरील विश्वास कमी होत असेल, तर त्यामागील कारणांचा पत्रकारांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात येणे ही केवळ पत्रकारांची समस्या नसून लोकशाहीसमोरील मोठी चिंता आहे, असे प्रतिपादन न्यूज १८ मराठीचे सहयोगी संपादक विलास बडे यांनी केले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने नांदेड येथे आयोजित मराठवाडा विभागीय एकदिवसीय कॅडर कॅम्पमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर, विलास बडे, व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय चीफ गगनकुमार महोत्रा, राष्ट्रीय संघटक सारिका पन्हाळकर, मराठवाडा अध्यक्ष तथा पालकसचिव डॉ. गणेश जोशी, आंतरराष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया आदी उपस्थित होते. पत्रकारितेचे बदलते स्वरूप, माध्यमांची विश्वासार्हता, ग्रामीण पत्रकारांसमोरील आव्हाने, सामाजिक माध्यमांचा वाढता प्रभाव, फेक न्यूज, टीआरपीची स्पर्धा आणि पत्रकारांनी स्वीकारावयाची नवी भूमिका यावर बडे यांनी सविस्तर भाष्य केले.

प्रश्न विचारणे हाच पत्रकारितेचा धर्म – पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे. समाजात काय घडत आहे, व्यवस्थेत कुठे चुका होत आहेत, सामान्य माणसाच्या कोणत्या समस्या आहेत आणि सत्ताधाऱ्यांकडून कुठे चुका होत आहेत, हे निर्भीडपणे समोर आणण्याचे काम पत्रकारितेचे आहे. पत्रकारिता केवळ एखाद्या व्यक्तीची स्तुती करण्यासाठी किंवा सत्तेच्या बाजूने उभे राहण्यासाठी नसून प्रश्न विचारणे हाच पत्रकारितेचा धर्म आहे, असे विलास बडे यांनी सांगितले.

मुक्त पत्रकारिता नसेल तर समाज अंध होतो, असे सांगत त्यांनी जॉर्ज ऑरवेल यांच्या विचारांचा संदर्भ दिला. लोकशाही व्यवस्थेत सरकार आणि सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र व निष्पक्ष पत्रकारिता आवश्यक आहे. जनतेला जागृत करणारी मुक्त पत्रकारिता ही नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिता नसेल तर समाजासमोर सत्याचा आरसा राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक – आंतरराष्ट्रीय फोरमचे आंतरराष्ट्रीय चीफ गगन महोत्रा यांनी पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या वेगवान युगात पत्रकारांनी केवळ पारंपरिक माध्यमांवर अवलंबून न राहता डिजिटल माध्यमे, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संवादप्रणालींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. पत्रकारितेला चांगले दिवस आणायचे असतील तर पत्रकारांनी तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. बदल स्वीकारणारी पत्रकारिताच भविष्यात अधिक सक्षमपणे उभी राहील, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय संघटक सारिका पन्हाळकर यांनी विकसित पत्रकारितेची संकल्पना स्पष्ट करताना नवीन विचार, कौशल्यवृद्धी आणि बदलत्या काळानुसार ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी संघटनेचे जगभरातील कामकाज आणि उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी पत्रकारांच्या हितासाठी आगामी काळात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याबरोबरच त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ठोस उपक्रम राबविण्यावर संघटनेचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी कॅडर कॅम्पच्या आयोजनाची माहिती दिली.

मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग – मराठवाडा अध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली कॅडर कॅम्पचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि राज्यस्तरीय नेतृत्व एकजुटीने काम करत असल्याने नांदेडमध्ये संघटनात्मक शक्तीचे दर्शन घडले. कॅम्पमध्ये प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख, राज्य सरचिटणीस चेतन कात्रे, नांदेड जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत, हिंगोली जिल्हाध्यक्ष रमेश कदम, परभणी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, लातूर जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जालना जिल्हाध्यक्ष राजेश भालेराव, बीड जिल्हाध्यक्ष जालिंदर धांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश कोंडेकर यांनी केले. राज्य सरचिटणीस गजानन देशमुख, सहसरचिटणीस श्रीनिवास भोसले, मराठवाडा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे, मराठवाडा सरचिटणीस सुनील जोशी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी कॅडर कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

लोकप्रतिनिधींनी केलेली कामे पत्रकारांनी मांडावीत : बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकारितेच्या भूमिकेवर भाष्य करताना पत्रकारांनी केवळ नकारात्मक बातम्यांपुरते मर्यादित न राहता लोकप्रतिनिधींच्या कामाचीही वस्तुनिष्ठ दखल घ्यावी, असे मत व्यक्त केले. एखाद्या लोकप्रतिनिधीने काम केले नसेल, तर त्याबाबतची बातमी पत्रकारांनी निश्चितपणे मांडावी. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आपल्या कामाची वस्तुस्थिती समजण्यास मदत होते आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी दिशा मिळते, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवरही कल्याणकर यांनी भूमिका मांडली. पत्रकारांच्या महामंडळाचा प्रश्न सरकारदरबारी प्रलंबित असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments