Homeनांदेडगौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांची हिमायतनगर शहरातील रस्त्यांची पाहणी; तातडीने खड्डे बुजविण्याच्या दिल्या सूचना

गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांची हिमायतनगर शहरातील रस्त्यांची पाहणी; तातडीने खड्डे बुजविण्याच्या दिल्या सूचना

नळयोजनेच्या कामाने रस्त्यांची चाळण, नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याची घेतली दखल

हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी गौरी-गणेश उत्सव, बैलपोळा तसेच विविध धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील नागरिकांची व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छता आणि दुरुस्तीच्या कामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी शहरातील बाजार चौकासह मुख्य रस्त्यांची पाहणी करून रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून घेण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनासह संबंधित ठेकेदारास दिल्या.

हिमायतनगर शहरातील रखडलेल्या पाणीपुरवठा नळ योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी खोदकामानंतर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. आगामी गौरी-गणेशोत्सव, बैलपोळा तसेच विविध धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांची मोठी वर्दळ वाढणार असताना रस्त्यांची ही दुरवस्था प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीपुरवठा नळ योजनेच्या कामासाठी शहरातील विविध रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र खोदलेले रस्ते व्यवस्थित पूर्ववत न केल्याने अनेक भागांत खड्डे, उखडलेले रस्ते आणि मातीचे ढिगारे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून, दुचाकीस्वार, पादचारी, शेतकरी, शालेय विद्यार्थी तसेच महिला पुरुष भाविक व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे श्रावण महिन्यात शहरातील मुख्य रस्त्यांवरील काही खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र सणासुदीच्या काळात शहरातील बाजारपेठेत आणि मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने उर्वरित खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गणेश मंडळांच्या मिरवणुका, बैलपोळा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरवस्था अपघाताला निमंत्रण ठरू नये, अशी नागरिकांची मागणी आहे.

याची दखल घेत नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी बाजार चौकासह शहरातील प्रमुख रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिल्या. सणांच्या काळात नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले.

IMG 20260825 WA0016 गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांची हिमायतनगर शहरातील रस्त्यांची पाहणी; तातडीने खड्डे बुजविण्याच्या दिल्या सूचना

गौरी-गणेशोत्सव आणि बैलपोळ्याच्या काळात शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी होत असते. गणेश मंडळांचे आगमन, विसर्जन मिरवणुका, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी तसेच सणानिमित्त ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक शहरात येतात. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीतील अडथळे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी नगरपंचायतीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था ही केवळ सणापुरती समस्या नसून, पाणीपुरवठा योजनेच्या कामानंतर रस्ते पूर्ववत करण्याच्या कामाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. रस्ते खोदायचे, पाइपलाइन टाकायची आणि त्यानंतर नागरिकांच्या माथी खड्डे सोडायचे, अशी परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी न करता खोदलेले रस्ते दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. यावेळी उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, मुख्याधिकारी समाधान मासाळ, बांधकाम अभियंता सचिन वाघमारे, लिपीक विठ्ठल शिंदे, बाळू हारडपकर तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

IMG 20260825 WA0017 गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांची हिमायतनगर शहरातील रस्त्यांची पाहणी; तातडीने खड्डे बुजविण्याच्या दिल्या सूचना

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, स्वच्छता, पथदिवे, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेची तातडीने पाहणी करून आवश्यक कामे पूर्ण करावीत. अन्यथा सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments