नांदेड, प्रतिनिधी| किनवट वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या प्रादेशिक किनवटमार्फत नागझरी, ता. किनवट येथील वन हद्दीत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या ३०० वॉच टॉवर सीमा स्तंभ (बाउंड्री पिलर) कामाची मजुरी तब्बल चार महिन्यांपासून थकीत असल्याचा आरोप मजूर माधव गोविंद गायकवाड यांनी केला आहे. थकीत मजुरी तातडीने मिळावी, या मागणीसाठी गायकवाड यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी सोमवारपासून नांदेड येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.



गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी किनवट वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या माध्यमातून ठरलेल्या प्रमाणे नागझरी येथील वन हद्दीत एकूण ३०० बाउंड्री पिलरचे काम केले. हे काम वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड व वनपाल व्ही. टी. जाधव, चिखली वनपरिमंडळ यांच्या हस्ते ठरलेल्या प्रमाणे करण्यात आले. मात्र काम पूर्ण होऊन चार महिने उलटूनही त्याची मजुरी मिळालेली नाही.



मजुरीच्या पैशांबाबत विचारणा केली असता, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांनी वनपाल व्ही. टी. जाधव यांना पैसे देण्यास सांगितल्याचे, तर वनपाल जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अद्याप पैसे मिळाले नसल्याचे सांगितल्याचा दावा गायकवाड यांनी निवेदनात केला आहे.



मजुरीची रक्कम रखडल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, आर्थिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. थकीत मजुरी तात्काळ मिळावी, या मागणीसाठी आपण बेमुदत आमरण उपोषणास बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपली मजुरीची रक्कम २४ ऑगस्टपर्यंत मिळाली नाही, तर त्याच दिवसापासून नांदेड येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल, अशी पूर्वसूचना त्यांनी दिली होती. तसेच उपोषणाबाबत स्वतंत्र पत्र किंवा लेखी पूर्वसूचना देणार नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची वन विभागाने तातडीने चौकशी करून संबंधित कामाची नोंद, मोजमाप व देयकांची पडताळणी करावी आणि थकीत मजुरी तत्काळ अदा करावी, अशी मागणी होत आहे. गायकवाड यांनी निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, सहाय्यक वनसंरक्षक किनवट, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट तसेच नांदेड ग्रामीण पोलिसांकडे दिल्या आहेत.

