Homeनांदेडशंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेत बाळासाहेब कऱ्हाळे यांची कोंडी?

शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेत बाळासाहेब कऱ्हाळे यांची कोंडी?

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भेटीत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय न करण्याची मागणी

लोहा| लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाला सध्या वेगळे वळण मिळताना दिसत आहे. माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्ष संघटनेत झालेल्या बदलांमुळे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कऱ्हाळे यांनी शिवसेनेचे युवा नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुंबईतील नंदनवन निवासस्थानी भेट घेतली.

शंकर अण्णा धोंडगे यांच्या शिवसेना प्रवेशावेळी त्यांच्यावर शिवसेना शेतकरी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर लोहा-कंधार तालुक्यातील पक्ष संघटनेची पुनर्रचना करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीत बाळासाहेब कऱ्हाळे यांच्या समर्थकांना अपेक्षित स्थान मिळाले नसल्याची चर्चा पक्षाच्या स्थानिक वर्तुळात आहे.

दरम्यान, शंकर अण्णा धोंडगे यांनी पक्ष संघटन आणि विस्ताराच्या कामाला वेग दिला असून, विधानसभा प्रमुख म्हणून अनुभवी दिलीपदादा धोंडगे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जुन्या आणि नव्या नेतृत्वामध्ये समीकरणे बदलत असल्याचे चित्र आहे.

अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंची भेट – शिवसेनेत आपण केलेल्या पक्षबांधणीच्या कामाची दखल घेतली जावी आणि जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका बाळासाहेब कऱ्हाळे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडल्याचे सांगण्यात येते. कऱ्हाळे यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेचा आढावाही यावेळी दिला. आमदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर आणि जिल्हाप्रमुख विनयभाऊ गिरडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

जुन्या शिवसैनिकांचा विचार केला जाईल – या भेटीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जुन्या शिवसैनिकांनी पक्षवाढीवर आणि पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा निश्चितच विचार केला जाईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते.

पक्षहितासाठी आणि संघटनवाढीसाठी काम करणाऱ्या शिवसैनिकांना डावलले जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केल्याने बाळासाहेब कऱ्हाळे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शंकर अण्णा धोंडगे यांच्या प्रवेशानंतर लोहा-कंधारमध्ये शिवसेनेच्या संघटनेत नव्या नेतृत्वाला मिळत असलेले महत्त्व आणि जुन्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भूमिका यावरून आगामी काळात पक्षांतर्गत राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments