नांदेड, प्रतिनिधी| “सांगा धनाचा साठा, अन् आमचा वाटा कुठाय हो?” या लोकशाहीर डॉ. वामनदादा कर्डक यांच्या गीतातून शासनाला जाब विचारत लोकपारंपरिक कलावंतांनी मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भव्य भजन आंदोलन केले. बहुजन टायगर युवा फोर्स आणि पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या वतीने आयोजित या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो साहित्यिक, शाहीर व लोककलावंतांनी पारंपरिक वेशभूषा व वाद्यांसह सहभागी होत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.



बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष, पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन साद केले. यावेळी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.



आंदोलनाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सामाजिक कार्यकर्ते कैलास माने पोटेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कलावंतांनी भजन, शाहिरी आणि पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले.



मानधन १० हजार करण्याची प्रमुख मागणी – वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मिळणारे सध्याचे दरमहा ५ हजार रुपयांचे मानधन महागाईच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजे असून ते किमान १० हजार रुपये करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नांदेड जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांची संख्या आणि जिल्ह्याचे कार्यक्षेत्र लक्षात घेता दरवर्षी पात्र लाभार्थ्यांची संख्या १०० वरून १००० पर्यंत वाढवावी, लाभार्थ्यांची वयोमर्यादा ५० वरून ४० वर्षे करावी, अशीही मागणी करण्यात आली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत कलावंतांना समाजप्रबोधन व जनजागृतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, केंद्र सरकारकडून वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनात करण्यात आलेली कपात दूर करून महाराष्ट्र शासनाने मानधनात किमान १० हजार रुपयांची वाढ करावी, कलावंतांना मोफत घरकुल तसेच त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षणाची सुविधा द्यावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
योजना समाजकल्याण विभागाकडेच देण्याची मागणी – दि. १६ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. ही योजना पूर्ववत जिल्हा समाजकल्याण विभागाकडेच सोपवावी, ग्रामीण भागातील नामवंत साहित्यिक, शाहीर व कलावंतांचा सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी पुरस्कार देऊन गौरव करावा, नांदेड शहरात भव्य सांस्कृतिक भवन उभारावे आणि जिल्हास्तरीय समितीसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशाही मागण्या करण्यात आल्या.
१३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेतील कामांची चौकशी करण्याची मागणी –लोककलावंतांच्या मागण्यांसोबतच हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील १३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या पाइपलाइनच्या कामाबाबतही निवेदनातून गंभीर आरोप करण्यात आले. पाइपलाइनसाठी सॅण्ड बॉक्सिंगची कामे न करताच कंत्राटदाराला बिले अदा करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
याप्रकरणी पूर्वी बडतर्फ करण्यात आलेल्या आणि त्यानंतर पुन्हा उपअभियंता म्हणून सेवेत रुजू झालेल्या एम. एस. बोडके यांच्याबाबतही निवेदनात कारवाईची मागणी करण्यात आली असून, त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या भजन आंदोलनाला पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे पदाधिकारी, भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके तसेच विविध सामाजिक संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
आंदोलनात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव मा. भवरे, शाहीर रमेश नारलेवाड, शाहीर बापुराव जमधाडे, भीमशाहिर माधव वाढवे, शंकर गायकवाड, ह.भ.प. बालाजी पांचाळ, अंकुश चित्ते, विकासराजा गायकवाड, शिवाजी डोखळे, अविनाश कदम, किशन ठमके, जळबा जळपते, परमेश्वर वालेगांवकर, आनंदा जळपते, सागर शिरमोड, ज्योतीताई बेदरकर, सुभाष गुंडेकर, रामजी कदम, तेजाब पाईकराव, केशव माने, वाघमारे बापू, विलास ढवळे, देवकाबाई मुलगीर, ज्योतीताई इंगोले, बबीता आठवले, भुजंग लोणे, शाहीर रामराव वानखेडे, शाहीर यमदलवा आदेगावकर, ज्ञानोबा बाबर, नामदेव जाधव मुगावकर, मीराताई जाधव, अरुणाताई सावते, नागनाथ वच्छेवाड, सुरेखा डोखळे, साहित्यिक महेश अण्णा पुरे, जयशिला जाधव, मथुराबाई माने, सुगंधा घोडके, सुशिला वालेगांवकर, अनिता जाधव, मुक्ता कदम, वनिता लोखंडे, कौशल्या नरवाडे, कांता आढाव, छाया कदम, स्वाती सोळंके, वच्छला शिरसुफळे यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो कलावंत उपस्थित होते. भजन आणि शाहिरीच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधणाऱ्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ लोककलेचा जागर आणि कलावंतांच्या हक्कांचा बुलंद आवाज घुमला.

