नांदेड, प्रतिनिधी| रेल्वे गाड्या व रेल्वे स्थानकांवर विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग हॉकर्सना कथितरित्या नाहक त्रास देऊन गाडीतून फेकून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिव्यांग हॉकर्सनी रेल्वे मंत्री, रेल्वे प्रशासन आणि नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास दिल्ली येथे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.



शाहजहान शेख अली शेख, भाऊसाहेब व्यंकट टोकलवाड व इतर अर्जदारांनी २१ जुलै २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, अर्जदार हे विविध प्रकारे दिव्यांग असून रेल्वे गाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकांवर हॉकर्स म्हणून रिंग, चिप्स, पॉपकॉर्न, खारेमुरे, वडापाव आदी खाद्यपदार्थांची विक्री करून आपल्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार मिळवतात.



मात्र, काही साईड पॅन्ट्री प्रमुख, पॅन्ट्रीधारक तसेच आरपीएफ व जीआरपीएफकडून मोठ्या प्रमाणात दबाव आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गाडीतून फेकून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही अर्जदारांनी नमूद केले आहे. विशेषतः परभणी–नांदेड–नंदीग्राम एक्स्प्रेस, धर्माबाद–परभणी देवगिरी एक्स्प्रेस, नांदेड–आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस तसेच नांदेड रेल्वे स्थानकावर दिव्यांग हॉकर्सना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.



या प्रकरणात पॅन्ट्री प्रमुख बालाजी सुरवेशी, पॅन्ट्री अलिम आणि आरपीएफ जावेद यांच्याकडून त्रास होत असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. या आरोपांची गोपनीय पद्धतीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिव्यांग हॉकर्सच्या सहा प्रमुख मागण्या – निवेदनातून दिव्यांग हॉकर्सनी रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये सर्व रेल्वे स्थानकांवर दिव्यांगांना ५ टक्के हॉकर्स आयडी देण्यात यावेत, कॅन्टीनमध्ये ५ टक्के स्टॉलची सुविधा मिळावी, तसेच दिव्यांगांना ५ टक्के साईड पॅन्ट्री परवाने देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय रेल्वेतील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी असलेला ४ टक्के अनुशेष भरण्यात यावा, त्रास देणाऱ्या कॅन्टीन व साईड पॅन्ट्रीधारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि रेल्वे तसेच रेल्वे स्थानकांवर काम करणाऱ्या दिव्यांगांना हॉकर्स आयडी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या निर्णयानुसार त्यांचे हक्क मिळावेत, तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर गदा आणू नये, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे. निवेदनातील आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने न्याय न मिळाल्यास दिल्ली येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शाहजहान शेख अली शेख, भाऊसाहेब व्यंकट टोकलवाड व इतर अर्जदारांनी दिला आहे.

