नांदेड, प्रतिनिधी | महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 27 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथील SVICT स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघाची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.


ही स्पर्धा रविवार, 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदान, विष्णुपुरी (नांदेड) येथे होणार आहे. स्पर्धेत 14 वर्षांखालील, 16 वर्षांखालील, 18 वर्षांखालील तसेच 20/23 वर्षांखालील मुला-मुलींसाठी धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, हर्डल्स, रिले आणि चालणे अशा विविध स्पर्धा होणार आहेत.


या स्पर्धेतील पात्र कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नांदेड जिल्हा संघात निवड केली जाणार आहे. याचवेळी 14 व 16 वर्षांखालील गटासाठी NIDJAM 2026-27 (अंतरजिल्हा राष्ट्रीय स्पर्धा) निवड प्रक्रियाही पार पडणार आहे.



खेळाडूंनी स्पर्धास्थळीच नोंदणी करावी. त्यासाठी आधार कार्ड, जन्म दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, जिल्हा नोंदणी शुल्क, इव्हेंट फी, दहावीची सनद, वय व रहिवासी प्रमाणपत्रांच्या सत्यप्रत सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेपूर्वी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) ची UID काढणे अनिवार्य आहे.
वयोगटानुसार पात्र जन्मतारीख :
14 वर्षांखालील : 28 ऑक्टोबर 2012 ते 27 ऑक्टोबर 2014
16 वर्षांखालील : 28 ऑक्टोबर 2010 ते 27 ऑक्टोबर 2012
18 वर्षांखालील : 28 ऑक्टोबर 2008 ते 27 ऑक्टोबर 2010
20 वर्षांखालील : 28 ऑक्टोबर 2006 ते 27 ऑक्टोबर 2008
संघटनेने स्पष्ट केले आहे की 23 वर्षांखालील गटासाठी केवळ जिल्हास्तरीय स्पर्धा होतील, या गटाची राज्यस्तरीय स्पर्धा होणार नाही. तसेच बाहेरील जिल्ह्यातील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. स्पर्धेच्या आयोजनासाठी विष्णू पूर्णे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून, स्पर्धा प्रमुख म्हणून वैभव दोमकोंडवार आणि ज्ञानेश्वर सोनसळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर, सचिव प्रलोभ कुलकर्णी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका समन्वयक किंवा जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा.

