नांदेड, प्रतिनिधी| नांदेड शहराला महाराष्ट्रातील आदर्श आणि सुंदर शहर बनविण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःचे घर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छता अभियानाला हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.


मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर व्हीआयपी रोडवरील शहीद जवान स्मारक परिसरात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते स्वच्छता करून तसेच भिंतीवर पेंटिंग करत ‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील यांच्यासह नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.


स्वच्छता मोहीम लोकचळवळ व्हावी
खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी सण-उत्सवांचे स्वागत स्वच्छ आणि सुंदर नांदेडमध्ये करण्याचे आवाहन केले. स्वच्छतेची मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ बनावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



नांदेड शहर पूर्णपणे कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने ही व्यापक मोहीम हाती घेतली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत मुख्य रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्या, वस्त्या आणि चौकांची सखोल स्वच्छता केली जाणार आहे. प्रमुख रस्ते व दुभाजकांची विशेष स्वच्छता, सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी, दुभाजकांवरील झाडांची छाटणी तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवासाठी विशेष स्वच्छता व्यवस्था
आगामी श्री गणेशोत्सव व दुर्गादेवी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे, मंदिर परिसर, विसर्जन मार्ग आणि उत्सव मार्गांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी चोवीस तास स्वच्छता व कचरा संकलनाची व्यवस्था करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. शहराची स्वच्छता कायम राखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

