बीड| जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.


तक्रारदाराकडून वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमावाड यांनी 45 लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचून 5 लाख रुपये खऱ्या आणि 40 लाख रुपये बनावट नोटांसह रक्कम स्वीकारताना त्यांना पकडले.


विशेष म्हणजे, श्रीनिवास लखमावाड हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचे रहिवासी असून, 2016 च्या महाराष्ट्र वनसेवा (MPSC) परीक्षेत ST प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून शासकीय सेवेत दाखल झाले होते. एकेकाळी कष्ट आणि जिद्दीचे उदाहरण म्हणून ओळखले जाणारे हे अधिकारी आता लाचखोरीच्या गंभीर आरोपामुळे चर्चेत आले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.




