हदगाव | हदगाव तालुक्याचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्याच्या निर्णयास हदगाव तालुका काँग्रेस कमिटीने तीव्र विरोध दर्शविला असून, यासंदर्भात आज तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. माजी आमदार तथा लोकनेते माधवराव पाटील जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले.
निवेदनात हदगाव तालुक्याचे सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, प्रशासकीय तसेच आरोग्यविषयक संबंध अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्याशी घट्ट जोडलेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयी-सुविधा, जनभावना आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करता तालुक्याचा किनवट जिल्ह्यात समावेश करणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका काँग्रेसने मांडली आहे.


हदगाव तालुका नांदेड जिल्ह्यातच कायम ठेवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे शासन व प्रशासनाकडे करण्यात आली. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या हिताचा विचार करून कोणताही निर्णय घेताना स्थानिक जनभावनांचा आदर राखावा, अशी मागणीही करण्यात आली.


यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या भावना आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन हदगाव तालुक्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचा निर्धार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हदगाव तालुक्याच्या प्रस्तावित प्रशासकीय पुनर्रचनेबाबत परिसरात चर्चा सुरू असून या विषयावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.



