Massive Fire In Islapur : इस्लापूर शहरात मध्यरात्री भीषण आग; चार दुकाने जळून खाक

नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे गॅस सिलेंडर बाहेर काढले; सुमारे दोन कोटींचे नुकसान

नांदेड/किनवट/इस्लापूर | इस्लापूर शहरातील मुख्य चौक परिसरात १४ मार्च रोजी उशिरा रात्री लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य चौकातील दीपक बूट हाऊस या दुकानाला रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील साईबाबा हार्डवेअर, साईबाबा उपहारगृह आणि ओम साई मोबाईल रिपेअरिंग या दुकानांनाही वेढले. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले व आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

आगीदरम्यान स्फोट होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी धाडस दाखवत उपहार गृहातील चार गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या आगीत रामराव जळबाजी बदुलवार यांच्या साईबाबा हॉटेलमधील १४ मोठे फ्रिज, सुमारे १० क्विंटल साखर, आईस फॅक्टरीचे साहित्य, टेबल-खुर्च्या व इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. तसेच पेंटा जळबाजी बदुलवार यांच्या साईबाबा हार्डवेअर दुकानातील ऑइल, टायर, नायलॉन दोरी, पाईप, मोटारी व अन्य साहित्यही आगीत नष्ट झाले.

याशिवाय चंद्रकांत राजाराम ताटीकुंडलवाड यांच्या ओम साई मोबाईल रिपेअरिंग दुकानातील इन्व्हर्टर, बॅटरी, स्पेअर पार्ट्ससह इतर साहित्य जळून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. तर दीपक शिवराम वानखेडे यांच्या दीपक बूट हाऊस दुकानातील चप्पल, बूट व इतर माल जळून अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर व किनवट येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सुमारे १५ ते १६ तासांनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला.
दरम्यान, घटनेचा पंचनामा तलाठी मुंडे यांनी केला असून विशेषतः बदुलवार यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण घटनेमुळे इस्लापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button