Saturday, June 27

Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

नांदेड | देगलूर तालुक्यात शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कठोर कारवाई केली आहे. रासायनिक खतांची कमाल विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याप्रकरणी तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देगलूर यांना संबंधित केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या तपासणीत पांडुरंग कृषी सेवा केंद्र, गणेश कृषी सेवा केंद्र, जिजाई कृषी सेवा केंद्र, सोनी कृषी सेवा केंद्र आणि आनंद फर्टिलायझर्स, देगलूर या पाच कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.

तपासणीदरम्यान काही केंद्रांकडून रासायनिक खतांची कमाल विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याचे तसेच युरिया खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना विक्री न केल्याचे आढळले. याबाबत सुनावणी घेतल्यानंतर संबंधित केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यात कुठेही रासायनिक खतांची जादा दराने विक्री होत असल्यास, विनापरवाना विक्री केली जात असल्यास किंवा खते उपलब्ध असूनही विक्री केली जात नसल्यास नागरिकांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी केवळ परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच खते व इतर कृषी निविष्ठांची खरेदी करावी, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!