नांदेड, प्रतिनिधी| ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी व उद्योजक यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून, स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले.

स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकात घेतलेल्या नव्या धोरणात्मक निर्णयांमुळे कृषी, ग्रामीण आणि डीप टेक क्षेत्रातील नवोपक्रमांना मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्री गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे आयोजित ‘प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संवाद’ या विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. महेश कोकरे, विविध स्टार्टअप्सचे प्रतिनिधी, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रादेशिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील विविध घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र स्टार्टअप धोरणाअंतर्गत राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेला सर्वसमावेशक सहाय्य दिले जात आहे. स्टार्टअप संस्कृती केवळ महानगरांपुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील युवक, विद्यार्थी व स्थानिक उद्योजकांपर्यंत पोहोचवणे हे राज्याचे स्पष्ट धोरण आहे.


स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकात प्रवेश करताना केंद्र सरकारने स्टार्टअप मान्यतेची चौकट अधिक सक्षम व भविष्याभिमुख केली असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या अधिसूचनेनुसार स्टार्टअपसाठी उलाढाल मर्यादा २०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच डीप टेक स्टार्टअपसाठी स्वतंत्र श्रेणी निर्माण करून त्यांची वयोमर्यादा २० वर्षे व उलाढाल मर्यादा ३०० कोटी रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

याशिवाय सहकारी संस्थांनाही स्टार्टअप मान्यतेत समाविष्ट करण्यात आल्याने कृषी, ग्रामीण व समुदायाधारित नवोपक्रमांना नवे बळ मिळाले आहे. या धोरणांमुळे गावपातळीवरील नवकल्पना देशपातळीवर नेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असून, यामध्ये महाविद्यालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर ‘इनोव्हेशन सिटी’ विकसित करण्यात येत असून, ही जागतिक पातळीवरील एक अद्वितीय संकल्पना ठरणार आहे. स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग आणि गुंतवणूकदार यांना एकाच परिसंस्थेत एकत्र आणून नवकल्पनांना जागतिक स्तरावर नेण्याचा उद्देश या प्रकल्पातून साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक डॉ. महेश कोकरे यांनी सर्वह इन्क्युबेशन फाऊंडेशन (SARVAH Incubation Foundation) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. प्रस्तावित १०,००० चौ. फूटांच्या Innovation & Entrepreneurship Space विषयी माहिती देत, नांदेड व मराठवाडा विभागात सक्षम स्टार्टअप व नाविन्यपूर्ण केंद्र उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व स्टार्टअप्सनी विकसित केलेल्या नवकल्पनांचे सादरीकरण, थेट संवाद सत्र तसेच डेमो स्टॉल्सद्वारे पाहणी करण्यात आली. हा संवाद कार्यक्रम नाविन्यपूर्ण विकास, प्रादेशिक उद्योजकता व युवकांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग असून, नांदेडसारख्या प्रादेशिक शहरांना स्टार्टअप नकाशावर अग्रस्थानी नेण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

