Wednesday, May 13

Nanded motorcycle theft : मोटारसायकल चोरीप्रकरणी मोठी कारवाई

नांदेड | नांदेड जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 26 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 10 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका सराईत आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 45/2026 (कलम 303(2), 111, BNS) अन्वये ही कारवाई करण्यात आली. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा दत्तात्रय वाकडे (वय 32, व्यवसाय मजूर, रा. पुष्पनगर, नांदेड) यास ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीकडून हिरो होंडा स्प्लेंडर – 17 मोटारसायकली, हिरो पॅशन प्रो – 4 मोटारसायकली, हिरो शाइन – 2 मोटारसायकली, हिरो HF डिलक्स – 1 मोटारसायकल, सुजुकी अ‍ॅक्सेस – 1 स्कूटर, असा एकूण 26 दुचाकी वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत अंदाजे ₹10,38,000/- इतकी आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सौम्यवर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर तपासात पो.उप.नि. विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली. नांदेड शहर व परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यवाहीचे स्वागत केले आहे. पुढील तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!