नांदेड | आजच्या धावपळीच्या युगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना, नांदेडमध्ये घडलेल्या एका घटनेने समाजात माणुसकी आणि सचोटी अजूनही जिवंत असल्याचा विश्वास दृढ केला आहे. टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे सदस्य खयुम पठाण यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.


दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता, रिक्षा क्रमांक MH-26 BD 2335 चालवत असताना खयुम पठाण (रा. नुरी चौक, महेबूब नगर, नांदेड) यांच्या रिक्षातून संगीता रवींद्र आनंदास (रा. अण्णाभाऊ साठे चौक, दत्तनगर, नांदेड) या दोन महिला प्रवाशांनी बरकी चौक ते अण्णाभाऊ साठे चौक असा प्रवास केला. प्रवासानंतर त्या घरी गेल्यावर लक्षात आले की त्यांचा पर्स व सुमारे ४० हजार रुपये किमतीचा Vivo कंपनीचा मोबाईल फोन रिक्षातच राहून गेला आहे.

घाईने मोबाईलवर संपर्क साधला असता, रिक्षा चालक खयुम पठाण यांनी तत्काळ फोन उचलून “मोबाईल सुरक्षित असून तो माझ्याच रिक्षात आहे” अशी माहिती दिली. ही बाब तात्काळ टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा) यांना कळवण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांना देण्यात आली.
पोलीस ठाण्यात महिला प्रवाशांना बोलावून, पोलीस निरीक्षक राजेश पुरी, टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा), जिल्हाध्यक्ष, पत्रकार आणि रिक्षा चालक खयुम पठाण यांच्या उपस्थितीत मोबाईल मालक संगीता रवींद्र आनंदास यांच्याकडे अधिकृतरीत्या सुपूर्द करण्यात आला.


या प्रसंगी पोलीस निरीक्षक राजेश पुरी तसेच मोबाईल परत मिळालेल्या संगीता आनंदास यांनी खयुम पठाण यांच्या प्रामाणिकपणाचे आणि टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले. समाधान व्यक्त करत महिला प्रवाशांनी रिक्षा चालकाला ५०० रुपयांचे बक्षीस देऊन आभार मानले.

ही घटना केवळ एक मोबाईल परत मिळाल्याची नसून, रिक्षा चालकांबाबत समाजात असलेली नकारात्मक धारणा बदलणारी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देणारी ठरली आहे. नांदेडच्या रस्त्यांवर आजही माणुसकी जिवंत आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

