हिमायतनगर/नांदेड| हिमायतनगर तालुक्यातील सवना ज गावात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. चाकूचा धाक दाखवून चारचाकी कारमधून गरोदर शेळी पळवून नेण्यात चोरटे यशस्वी ठरल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना दि. २० जानेवारी रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजता घडली.


सवना ज येथील रहिवासी, काबाडकष्ट करणारे अल्पभूधारक शेतकरी नामदेव नारायण अनगुलवार हे अनेक वर्षांपासून जोडधंदा म्हणून शेळीपालन करत आहेत. नेहमीप्रमाणे ते आपल्या घरासमोर बाजावर बसून शेळीवर लक्ष ठेवून असताना अचानक एक चारचाकी कार घटनास्थळी येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी थेट चाकूचा धाक दाखवत अनगुलवार यांना धमकावले.

चोरट्यांनी त्यांच्या मालकीची गरोदर, सुमारे २० हजार रुपये किमतीची, तीन पिलांची आई शेळी दोरी कापून जबरदस्तीने कारमध्ये टाकली आणि क्षणात घटनास्थळावरून फरार झाले. अनगुलवार यांनी आरडाओरडा केला असता मुलगा दिगंबर अनगुलवार व शेजारील नागरिक धावून आले; मात्र तोपर्यंत कार सुसाट वेगाने निघून गेली होती.


या घटनेमुळे अनगुलवार कुटुंबावर मानसिक आघात झाला असून, शेळीपालन करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री शस्त्राचा धाक दाखवून चोरी झाल्याने गावातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात सवना ज गावात चोरीची कोणतीही घटना घडली नव्हती.

घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस जमादार गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे तसेच संशयित वाहनाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, रात्री गस्त वाढवावी व चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांच्यासह ग्रामस्थांकडून होत आहे.

