Aarush Chikhale : आरुष चिखलेची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री

IMG 20260110 WA0017 Aarush Chikhale : आरुष चिखलेची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री

नांदेड | पोदार इंटरनॅशनल स्कूल, नांदेड येथील इयत्ता २ ‘ई’ मध्ये शिक्षण घेत असलेला आरुष सिंधू अमर चिखले याने अत्यंत लहान वयातच मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले आहे. अवघ्या सहाव्या वर्षी ‘बाप्या’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात त्याने सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे.

विशेष म्हणजे ‘बाप्या’ या चित्रपटाची निवड पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) मध्ये प्रदर्शनासाठी करण्यात आली असून, ही बाब नांदेड जिल्ह्यासह शालेय वयातील कलाकारासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले असून निर्मितीची धुरा मुक्ता तिवारी यांनी सांभाळली आहे. चित्रपटात देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. आरुषने साकारलेल्या भूमिकेतून त्याचा नैसर्गिक अभिनय, आत्मविश्वास आणि निरागस भावभावना प्रेक्षकांच्या मनाला भावत आहेत.

आरुष चिखले हा लोहा तालुक्यातील धावरी गावचा भाचा असून, आजी मंगल इंगळे व आजोबा विठ्ठल नारायण इंगळे यांचा तो नातू आहे. शेतकरी कुटुंबातून आलेला हा चिमुकला कलाकार ग्रामीण भागातूनही मोठे कलाकार घडू शकतात याचे जिवंत उदाहरण ठरत आहे. त्याचे मामा सावन इंगळे (शिक्षक) व मामा डॉ. सचिन इंगळे असून हा सुशिक्षित व संस्कारक्षम परिवार आहे.

या यशामागे आरुषचे वडील अमर चिखले आणि आई सिंधू चिखले यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले आहे. आरुषच्या या घवघवीत यशाबद्दल शाळा, शिक्षक, पालक, मित्रपरिवार तसेच सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रणीताताई देवरे, धावरीचे माजी सरपंच साहेबराव पाटील काळे, पत्रकार युनूस शेख, पंडित पाटील गाडेकर, अभंग पाटील गाडेकर, रुक्माजी पवार, संग्राम पाटील गाडेकर आदी मान्यवरांनी आरुषचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील एका चिमुकल्याने मोठ्या पडद्यावर झळकणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब असून, आरुष चिखलेच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top