हिमायतनगर, अनिल मादसवार | धानोडा–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सरसम–इंदिरानगर रस्त्यालगत महावितरणकडून विद्युत पोल उभारणीचे काम सुरू असून, यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी तीव्र चिंता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरणच्या नियमानुसार मुख्य रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर पोल उभारणे अपेक्षित असताना, संबंधित ठेकेदाराकडून थेट रस्त्यालगत व वाहतुकीच्या मार्गात पोल उभे करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला पोल उभे करून काम केले जात असून, या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे वाहनधारक, शेतकरी व पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून दररोज अवजड वाहने, दुचाकी, चारचाकी तसेच शेतमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात अपुरा प्रकाश, अरुंद रस्ता आणि थेट रस्त्यालगत उभे केलेले विद्युत पोल ही अपघातांना निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण करत आहेत.
“मुख्य रस्त्यापासून ठरावीक अंतरावर पोल उभे करण्याऐवजी रस्त्यालगतच काम का केले जात आहे? ठेकेदार जनतेच्या जीवाशी खेळ तर करत नाही ना?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक व शेतकरी उपस्थित करत आहेत.
याप्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व पोल सुरक्षित अंतरावर हलवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एखादा गंभीर अपघात घडण्याआधी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

