हिमायतनगर, अनिल मादसवार| नुकत्याच संपन्न झालेल्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्यासह सर्व नगरसेवकांचा श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व संचालकांच्या हस्ते सन्मानपूर्वक स्वागत करून निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


या वेळी ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित जनप्रतिनिधींना विश्वास व्यक्त करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व यशस्वी ठरो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. नगरविकास, सार्वजनिक सोयीसुविधा आणि धार्मिक स्थळांच्या सुवीधांच्या उभारणीसाठी ट्रस्ट व नगरपंचायत यांच्यात सहकार्यात्मक भूमिका राहील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.


परमेश्वर मंदीरात संपन्न झालेल्या या बैठकीत आगामी काळात होणारे सण-उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यावर भर देण्यात आला. श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवासाठी हिमायतनगर नगरपंचायतीकडून जास्तीत जास्त सहकार्य केले जाईल. यात्रेस येणाऱ्या नागरिक व भाविक भक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी नगरपंचायत प्रशासन व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी दक्षता घेतील. तसेच ठिकठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांनी दिले. तसेच स्वागत सत्काराबद्दल त्यांनी श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.


