हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नगरपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने स्वबळावर लढत देऊन आपली स्वतंत्र ताकद अधोरेखित केली असून, गटाचे तीन उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही मोठ्या नेत्याला प्रचारासाठी न बोलावता स्थानिक जनतेच्या विश्वासावर ही लढत जिंकत ठाकरे गटाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.


नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक सेठ यांच्यासह आठ नगरसेवक निवडून आणले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून सरदार खान हे एकमेव उमेदवार विजयी झाले.


दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर प्रभावी संपर्क, संघटनशक्ती आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर विजय मिळवला. माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या पत्नी सुचिता राठोड, विठ्ठलभाऊ ठाकरे आणि जिशान मिर्झा यांनी मताधिक्याने विजय मिळवत ठाकरे गटाची स्वतंत्र ओळख ठळक केली आहे.


या निकालामुळे हिमायतनगरच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व कायम असले तरी उद्धव ठाकरे गटाने स्वबळावर लढत मिळवलेले यश आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.


