नांदेड l मेरा युवा भारत केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता द्वितीय पदयात्रा आणि विकसित भारत पदयात्रा 11 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे उत्साहात संपन्न झाली.


सकाळी 8 वाजता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड, आयटीआयच्या उपप्राचार्या श्रीमती कविता दासवाड, सायन्स कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. अरुणा शुक्ला, सिडको इंदिरा कॉलेजच्या डॉ. भागवत पास्तापुरे, मोहन कलबरकर आणि गोडबोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला प्रारंभ झाला.



पदयात्रेत सहभागी युवक-युवतींनी हातात तिरंगा घेऊन “एक भारत, आत्मनिर्भर भारत”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले. अण्णा भाऊ साठे चौक मार्गे या पदयात्रेचा श्री गुरु गोबिंदसिंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे समारोप झाला.


कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा माय भारत तर्फे सत्कार करण्यात आला. युनिटी मार्चच्या माध्यमातून तरुणांमध्ये सामाजिक जाणीव, एकात्मता आणि स्वावलंबनाची भावना अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन चंदा रावलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.


यानंतर एकात्मा सांस्कृतिक कला मंडळ, बळीरामपूर यांनी देशभक्तीपर गीतांनी गायले. लय स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्ये सादर केली तसेच महाराष्ट्राची पारंपरिक लोककला व गोंधळाचे सादरीकरण केले. अखेरीस सर्व युवकांनी “आत्मनिर्भर भारत” होण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन कलबरकर (गटनिदेशक) यांनी केले. या कार्यक्रमासाठी आयटीआयचे सर्व गटनिदेशक, विविध सेवाभावी संस्था, युवक मंडळे आदीची उपस्थिती होती.


