देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| सुकनी ते कपिलधार या पारंपरिक पदयात्रेचे शहापूरवासीयांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. कार्तिक पौर्णिमेनिमित्त बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी ही पदयात्रा निघाली आहे.


या यात्रेत सहभागी झालेले भाविक सुकनी, शेळगाव, शहापूर, वनाळी, सुगाव, एकलारा, मोटरगा, चाडोळा, मुखेड, सावरगाव, जाब, हाडोळती, शिरूर, चापोली, चाकूर, वाढवणा, वडवळ, गंगाखेड, परळी, आबाजोगाई आणि माजरसुबा या मार्गावरून पंधरा दिवस सतत चालत बीड जिल्ह्यातील कपिलधारकडे वाटचाल करत आहेत.


या पदयात्रेदरम्यान सुमारे अडीचशे ते तीनशे किलोमीटरचे अंतर भाविक पार करतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील लाखो भाविक कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी दाखल होतात.


शहापूर येथे आलुर येथील शिक्षक राजू अजगरे यांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी पदयात्रेतील सर्व भाविकांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



