Triple accident : हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ तिहेरी अपघात ; दोन ठार, आठ जखमी

IMG 20251018 WA0071 Triple accident : हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ तिहेरी अपघात ; दोन ठार, आठ जखमी

हदगाव, गौतम वाठोरे| तुळजापूर–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर सुरू असलेल्या डागडुजीच्या कामादरम्यान कोणतेही पर्यायी रस्ते किंवा सूचना फलक न लावल्याने भीषण तिहेरी अपघात घडला. दिनांक १८ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास हदगावपासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावरील भानेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला आहे.

महामार्गावर डागडुजेसाठी फिरणारे जेसीबी वाहन, नांदेडवरून आर्णीकडे जाणारे आयशर वाहन आणि चाकूरवरून चंद्रपूरकडे जाणारे चारचाकी अशा तिन्ही वाहनांच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश 
लातूर येथील मनोज रामराव देवगुरे (३४) आणि मंजुषा देवदास आईलवार (३७) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मनोज देवगुरे हे सॉफ्टवेअर इंजिनीयर असून ते मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी कुटुंबासह चंद्रपूरकडे जात होते. तर या अपघातात गंभीर जखमी झालेले पियुष देविदास आईलवार (४२), मंजुषा निळकंठ असेवाढ (४०), रामराव देगुरे (६०), प्रतिभा देगुरे (५७), दत्तात्रेय अंकुटे (२५), निधी आसेवाड (१४) , शरयू असेवाड (७) सर्व रहिवासी लातूर येथील असून, शाहरुख खान (३४), आयशर वाहन चालक, रा. खंडवा (मध्यप्रदेश) येथील आहे.

स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून, अंकुश गोदजे, बालाजी ढोरे, राजू तावडे, गजानन देवसरकर, मिलिंद पाईकराव, गंगाधर काळे, शंकर जळके, अनिल देशमुख, शुभम गलांडे यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालय, हदगाव येथे दाखल करून पुढे नांदेडला हलविण्यात मदत केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात डॉ. प्रदीप स्वामी, डॉ. दादाजी ढगे आणि डॉ. बालाजी पोटे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी व्यवस्था केली.

ढिसाळ नियोजनावर संताप
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, महामार्ग विभागाने दुरुस्तीचे काम सुरू असताना इशारा फलक, पर्यायी रस्ता किंवा वाहतूक व्यवस्था केली नव्हती. यामुळेच अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top