लोहा/नांदेड| श्री क्षेत्र खंडोबारायाच्या माळेगाव यात्रेचा लौकिक अधिक वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन राज्य विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. “माळेगाव यात्रेचा पारंपारिक अश्व बाजार देशपातळीवर प्रसिद्ध व्हावा यासाठी सर्वानी राजकारण बाजूला ठेवून सामूहिक सहकार्य करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. यात्रेच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी दिली.


यात्रा परिसरात माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मराठवाड्याच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान असलेल्या या यात्रेचे वैभव अधिक उजळवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


१८ ते २२ डिसेंबरदरम्यान यात्रा
यंदाची माळेगाव यात्रा १८ ते २२ डिसेंबर या काळात भरणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या तयारीचा आढावा बैठक माळेगाव येथे घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषद, पंचायत समिती, पशुसंवर्धन, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा, पोलीस, समाज कल्याण, बांधकाम, महिला व बालकल्याण, जलसंधारण यांसारख्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपल्या तयारीबाबत माहिती दिली. मालेगाव यात्रेतील विकासासाठी महत्त्वाचे प्रस्ताव, घोडे बाजाराचा विकास, पोलिसांसाठी स्वच्छतागृह बांधकाम, तलावातील घाट सुशोभीकरण, अतिक्रमण हटवणे व रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, पारंपारिक कलावंतांचा सन्मान व संरक्षण आदींबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.


“माळेगाव यात्रा ही कलावंतांची पंढरी आहे. पारंपारिक लोककलेचा सन्मान येथे केला जातो. यात्रेत येणाऱ्या प्रत्येक कलावंतांचा सन्मान आणि संरक्षण झाले पाहिजे. ही आपली सांस्कृतिक शान आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास यात्रेचे वैभव निश्चितच वाढेल.” असे आमदार चिखलीकर यांनी म्हंटले आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी जगताप, तहसीलदार विठ्ठल परळीकर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, कार्यकारी अभियंता आर. डी. रावसाहेब, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आवुलवार, कृषी अधिकारी निलकुमार आयतोडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पडिले, उपअभियंता शिवाजी राठोड, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, तसेच माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, शासकीय गुंतवणूकदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक वारशाचा गौरव
माळेगाव यात्रा ही पारंपारिक अश्व बाजार आणि लोककलेसाठी प्रसिद्ध आहे. यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील तसेच राज्यातील हजारो नागरिक, शेतकरी, कलावंत येथे येतात. पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मिळणारा निधी वापरून यात्रेला नवे रूप मिळणार आहे.


