हिमायतनगर | येथील रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात शासकीय कामकाजात (सेटलमेंट) करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. दलालांच्या वावरामुळे नागरिकांच्या कामासाठी अधिकाऱ्याकडून ताटकळत ठेवले जात आहे. संबंधित कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांऐवजी दलालांकडे गेल्यास तात्काळ कामे होत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मिर्जा नूहीबेग यांनी केला आहे.


हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, जमीन, घर, जागा, प्लॉट खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांची रजिस्ट्री कार्यालयात नेहमी गर्दी होताना दिसत आहे. तर यासाठी लागणारे प्रमाणपत्र, नकाशा व इतर कागदपत्रासाठी भूमिअभिलेख कार्यालयात जावा लागत आहे. मात्र दलालांच्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्यांना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं कठीण झालं असून, कामासाठी दलालांच्याच सांगण्यावर अवलंबून राहावं लागत आहे.


याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या मात्र काहीच फरक पडत नसल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार कोणतेही दस्तऐवज तपासणे, नोंदणी, उतारा मिळवणे यासाठी दलालच मध्यस्थी करतात. शासकीय कामे जलद करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर लाचलुचपत सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. काही दलाल कार्यालय परिसरातच बिनधास्त फिरत असून, त्यांना अधिकारी, कर्मचारी वर्गाचं पाठबळ असल्याचं तक्रारकर्ते व नागरीकातून बोलले जात आहे.


तसेच, “ऑनलाईन व्यवस्था सुरू असतानाही व्यवहार पारदर्शक होत नसल्याचं” अनेक नागरिकांनी सांगितलं. दलालांमुळे शासकीय कार्यालयावरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. या दलालांच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून, शासकीय कर्मचाऱ्या ऐवजी रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात वावरणाऱ्या दलालांवर कडक कारवाई व्हावी. कामात पारदर्शकता आणून जनतेला सुलभ सेवा द्यावी. कार्यालय परिसर दलालमुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासनाकडून तातडीने चौकशी व कारवाई न झाल्यास दलाल व त्यांच्या माध्यमातून कामे करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मिर्जा नूहीबेग यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

