हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील चिंचगव्हान येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गावातील ३५ वर्षीय गजानन केरबा गव्हाळे (खाजगी वाहन चालक) आणि त्यांच्याच गावातील २८ वर्षीय उमा बालाजी कपाटे (दोघेही विवाहित व तिन तिन अपत्यांचे पालक) या प्रेमीयुगुलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार ५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला.


एकाच समाजातील असल्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. जवळपास वर्षभर दोघेही आपल्या कुटुंबियांपासून दूर राहात होते. काल ५ ऑक्टोबर रोजी ते चिंचगव्हान येथे परतले असता घरच्यांच्या विरोधामुळे नैराश्येतून त्यांनी गावालगतच्या शेतात दुपारच्या सुमारास विष घेतल्याचे समजते.


स्थानिक युवकांनी तात्काळ मदत करत त्यांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री दोघांचा मृत्यू झाला. आज (६ ऑक्टोबर) त्यांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.


या घटनेने चिंचगव्हान गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा तपास मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक दाडे करीत आहेत. अद्याप कोणत्याही कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.



