नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे पीएम-स्वनिधी योजनेच्या सुधारित कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक १७.०९.२०२५ ते ०२.१०.२०२५ या कालावधीमध्ये राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान विभागामार्फत लोककल्याण मेळावा अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून दि.०१.१०.२०२५ रोजी कै.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे खाद्यान्न प्रक्रियेतील पथविक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.


या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते झाले.यावेळी मनपा आयुक्त यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना खाद्यपदार्थ विक्री करताना स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून खाद्यान्न प्रक्रियेतील व्यवसायामध्ये मोठी संधी असल्याचे विशद करताना जास्तीत जास्त खाद्यपदार्थ व्यवसायातील फेरीवाल्यांनी पीएम-स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. फेरीवाल्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न महानगरपालिकेमार्फत करण्यात येतील असे आश्वासन यावेळी मनपा आयुक्तांनी दिले. यावेळी उपायुक्त नितीन गाढवे, क्रिडा अधिकारी रमेश चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती.



कार्यक्रमा दरम्यान भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे प्रवीण प्रशिक्षक अशोक जोगदंड यांनी प्रशिक्षण वर्गामध्ये FSSAI ची अनुज्ञप्ती प्राप्त करण्यासाठी आवश्यक निकष, आणि व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी करावयाच्या स्वच्छता व दर्जाविषयक सुधारणा याविषयी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.शहरातील सुमारे 350 फेरीवाल्यांनी सदर प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक व्यवस्थापक चंद्रकांत कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक अशोक सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक अमोल देशपांडे, व्यवस्थापक प्रवीण मगरे व विभागातील सर्व समुदाय संघटक यांनी विशेष प्रयत्न केले.




