नांदेड/नायगाव/उमरी/धर्माबाद/बिलोली| नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेती पिकाबरोबर जीवितानी आणि जनावरांची हानी झाली. ७ लाख ७४ हजार ३१३ बाधित शेतकऱ्याचे ६ लाख ४८ हजार ५३३.२१ हेक्टर शेत पिकाचे नुकसान झाले आहे.


या नुकसानीच्या भरपाईसाठी दि.१८ जुलै रोजी शासन निर्णयानुसार जिल्ह्याला ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्या मदतीनुसार जिरायदार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ८,५०० रुपये दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यात येणार आहे. या तुटपुंजी मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसत आहे. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, मागच्या सरकारच्या काळात शासन निर्णय दि.०१/०१/२५ व दि.१७/११/२०२२ अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जी मदत जिरायदार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १३,६०० रुपये तीन हेक्टर पर्यंत मदत दिली होती त्याचप्रमाणे यावर्षी मदत देण्यात यावी आणि बळेगाव आणि बाबळी बंधारा बॅकवॉटर मुळे नायगाव, उमरी, धर्माबाद, बिलोली तालुक्यातील लाखो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये तात्काळ देण्यात यावी आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करून कायमचा मावेजा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.


यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. भगवान मनुरकर, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते धोंडीबा पवार, प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख, गोविंद जाधव, गोविंद हिवराळे, प्रकाश सोनकांबळे, संजय जाधव इत्यादी शेतकरी उपस्थित होते


