नवी दिल्ली| महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाले आहेत.


उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत मतदान झाले. एकूण ९८ टक्के मतदान झाले असून यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना एकूण 752 मतांपैकी पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली आहेत तर इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी 300 मते मिळाली आहेत.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सकाळी 10 वाजता संसद भवनात सुरू झाली. देशभरातील खासदारांनी आपले मतदान केले. सायंकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काटेकोर सुरक्षा व्यवस्था आणि पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेचा निकाल सायंकाळी 7:30 वाजता राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी यांनी जाहीर केला. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया शांततेत आणि पूर्णपणे नियमांचे पालन करून पार पडल्याचे स्पष्ट केले.


सी.पी. राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते असून, त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी झारखंड येथेही राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही अभिनंदन
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत विजयी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे की, राधाकृष्णन यांचे जीवन सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताप्रती निष्ठेचे प्रतीक आहे. शिक्षण, सामाजिक उत्थान आणि सुशासनातील योगदान प्रेरणादायी आहे. आपल्या अनुभव आणि दूरदृष्टीमुळे भारत नव्या उंची गाठेल आणि जागतिक स्तरावर सशक्त स्थान प्राप्त करेल. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपले मार्गदर्शन अमूल्य आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राधाकृष्णन यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, “ राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. त्यांनी राज्यपालपदाचा गौरव वाढवला. समर्पण आणि विनम्र नेतृत्वाचा हा सन्मान आहे. विकासाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांच्या अनुभवाचा देशाच्या लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या सक्षमीकरणासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.
देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी. पी. राधाकृष्णन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
देशाचे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार श्री. सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. संसदीय परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी, संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी उपराष्ट्रपतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या अनुभवाचा देशाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, श्री. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला विजय ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. श्री. राधाकृष्णन यांचा हा विजय ‘एनडीए’च्या एकजुटीचा आणि लोकांच्या केंद्र सरकार वरील विश्वासाचा, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा विजय आहे. देशातील लोकशाही संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी ते निश्चितच योगदान देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

