नांदेड l आई हीच आपली पहिली शिक्षिका असते. जीवनात येणाऱ्या अडचणी, सुख-दुःख आपण आपल्या आईलाच सांगतो. तीच आपल्याला जगण्याची ताकद देते. म्हणून आईचा सन्मान करणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. आई आपली कायमची मैत्रीण असते; ज्याला आई नाही त्यालाच तिचे महत्व कळते. त्यामुळे आईचा सन्मान करा, तरच समाज तुमचा मान ठेवेल, असे प्रतिपादन नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए, डॉ. प्रवीण पाटील यांनी केले.


शिक्षक दिनाच्या औचित्याने पीपल्स कॉलेजमध्ये मंगळवारी शिक्षक दिन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि इयत्ता अकरावी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळा नरहर कुरुंदकर सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर होते. यावेळी व्यासपीठावर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, सचिव प्रा. श्यामल पत्की, शालेय समितीचे अध्यक्ष अँड. प्रदीप नागापूरकर, उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. प्रवीण पाटील म्हणाले की, कॉलेजला येणे आणि ज्ञानार्जन करणे हा विद्यार्थ्यांचा धर्म आहे. महाविद्यालयात आल्यावर अनेक मित्र मिळतात आणि त्यातून मैत्री अधिक दृढ होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती नेहमी आदर बाळगला पाहिजे. आयुष्य घडवणाऱ्या शिक्षकांचे ऋण कधीही फेडता येत नाही, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी.
संस्थेच्या सचिव प्रा. श्यामल पत्की यांनी आपल्या भाषणात कला व वाणिज्य शाखेचे महत्त्व अधोरेखित केले.


त्या म्हणाल्या की, “कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी या शाखांचा उपयोग नाही म्हणून निराश होऊ नये. या शाखांमधूनच जगण्याचे खरे धडे मिळतात. स्वतःला कमी समजण्याची गरज नाही. घेतलेल्या शाखांबद्दल प्रेम आणि आत्मविश्वास ठेवा, तरच जीवन सुंदर बनेल. कल्पनाशक्ती आणि वास्तव यांची सांगड घातली की अनेक गोष्टी सुंदर भासतात.”

शालेय समितीचे अध्यक्ष अँड. प्रदीप नागापूरकर म्हणाले की, कला आणि वाणिज्य शाखांना विशेष महत्त्व आहे, कारण या क्षेत्रांतून अनेक यशाचे दरवाजे खुले होतात. चांगला माणूस घडण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किडे न बनता सर्वांगीण विकास साधावा.
प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांनी अध्यक्षीय समारोप करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रेया पांगरीकर , संस्कृती कुलकर्णी, रोहन नवघडे या गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर दिले तर वैष्णवी घोडजकर, तेजस्वी सोनाळे, रोहिणी भोजने, हंसिका पटेल आणि सांची वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये कला व वाणिज्य शाखेतील बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक प्रा. डॉ. पूनम लोहाना यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. विजय कदम यांनी तर प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय कदम, डॉ.पुनम लोहाना, डॉ. विनायक देव, प्रा. प्रविण चौधरी, डॉ. विनोद चव्हाण, प्रा.किरण बिचकुंदे, कार्यालयीन अधीक्षक श्री रोहिदास आडे,श्री राहुल गवारे,श्री रवी शेंडेराव शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
प्रा. विलास वडजे, डॉ.सुनिता माळी, डॉ. राजेश सोनकांबळे, डॉ. आम्रपाली कसबे, डॉ.माया भालेराव,प्रा. संतोष कांबळे, प्रा.गंगाधर ताडोड, प्रा. आदित्य गोडबोले,डॉ. अनसुया पंदीलवाड, प्रा. स्वाती सोनाळे, आधी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


