Homeक्राईमअय्यप्पा स्वामी मंदिरातील एक लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास -NNL

अय्यप्पा स्वामी मंदिरातील एक लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे। शहरातील माहूर मार्गावरील अय्यप्पा स्वामी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेशद्वारासह मुख्य मंदिरातील तब्बल सहा कुलूपं तोडून चांदीचे मुकुट, देवांच्या छोट्या सुवर्ण प्रतिमा, कपाट व दानपेटीतील रोख रक्कम आदी मिळून सुमारे एक लाख 33 हजार 300 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. फोडलेली दानपेटी शेजारच्या नाल्याजवळ फेकून देण्यात आली आहे. चोरीची ही घटना रविवार(दि.16)च्या रात्री 11.15 ते सोमवारी(दि.17) पहाटे 5.30 च्या दरम्यान घडली आहे. याच मंदिरातील ही चोरीची ही तिसरी घटना असून, श्वान पथक पाचारण करूनही काही हाती लागले नसल्याचे सूत्रांकडून कळाले.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंदिरातील पुजारी राकेश पांडे आपल्या कुटुंबियांसह आणि वॉचमन मारुती मगर हे रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता पर्यंत जागे होते. त्यानंतर त्यांनी मंदिराची सर्व दारे बंद करून झोपी गेल्यावर सकाळी 5.30 वाजता उठले. तेव्हा त्यांना मुख्य मंदिर, पाठीमागील हॉलची दारे सताड उघडी दिसली. गर्भगृहातील दानपेटी जागेवर नव्हती तर मंदिरातील कपाट फोडलेल्या अवस्थेत दिसले.

अय्यप्पा स्वामी व इतर देवतेच्या मूर्तींच्या मस्तकावरील चांदीचे मुकुट दिसले नाही. त्यांनी तपासणी केली असता, जवळपास 85 हजार रुपये किमतीचे सुमारे एक किलो चांदीचे दोन मुकुट, 21 हजार 300 रुपये किंमतीच्या प्रत्येकी एक ग्रॅम सोन्याच्या विष्णू,सूर्य व दुर्गादेवीच्या पूजेतील तीन प्रतिमा, कपाटातील रोख 12 हजार रुपये आणि दानपेटीतील अंदाजे 15 हजार रुपये असे एकूण एक लाख 33 हजार 300 रुपये किमतीच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूचा परिसर तपासल्यावर चोरट्यांनी प्रवेशद्वाराच्या कुलुपासह मंदिर परिसरातील एकूण सहा कुलुप तोडले होते. फोडलेली स्टीलची दानपेटी मंदिराबाहेर डाव्याबाजुच्या नाल्यात फेकून दिलेली आढळली.

पुजारी व पहारेकऱ्यांने तातडीने ही बाब मंदिराचे विश्वस्थ विलास गुरूस्वामी नेम्मानीवार यांना मोबाईलद्वारे कळविली. विलास गुरूस्वामींनी लगेच पोलीस स्टेशन गाठून ही खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मंदिराच्या सभागृहात चोरांच्या पावलांचे ठसे उमटले होते, तर कुलूप उचकटण्यासाठी उपयोगात आणलेला लोखंडी राड व एक चप्पल जोडही मंदिराबाहेर आढळले. यावरून सोमवारी सकाळी सुमारे 10.30 च्या सुमारास श्वानपथक बोलावून घेऊन तपासणी करण्यात आली असता, श्वानाने मंदिरापासून माहूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापर्यंत माग काढला. पुढे काही गाडे सरकले नाही. अर्थात तेथून कुठल्यातरी वाहनाद्वारे चोरटे पसार झाल्याचा अनुमान काढण्यात आला.

मंदिरातील सीसीटीव्ही गत वर्षभरापासून नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. विलास गुरूस्वामीच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरुद्ध किनवट पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.नि.सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक सागर झाडे करीत आहेत. या मंदिरातील चोरीची ही तिसरी घटना आहे. पहिल्या चोरीच्या घटनेतही दीड ते दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविल्या गेला होता. चोरीच्या दुसऱ्या घटनेत फारसे नुकसान झाले नाही मात्र या तिसऱ्या वेळी चोरट्यांनी चांगलाच हात मारला.

महिन्याभरापूर्वी तालुक्यातील उनकेश्वर मंदिरातील दानपेटी घेऊन पसार होतांना चोर सीसीटीव्ही कैद झाला होता. 15 दिवसापूर्वी शहरातील एकाच दिवशी कृष्ण मंदिर व बालाजी मंदिरातील ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. चार-पाच दिवसापूर्वी हिरो शो रुम व डॉ.सुनील राठोड यांचे घरी एकाच रात्री चोरट्यांनी सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लांबविला. या घटना पाहता चोरांवर पोलिसांचा कसलाही वचक राहिला नसल्याचे वाटते. विशेष म्हणजे, यातील कुठलीही चोरी उघडकीस आली नसल्यामुळे, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments