नांदेड| गेल्या ६३ महिन्यापासून अखंडितपणे सुरू असलेल्या धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या कायापालट उपक्रमाची तुलना जगातील कोणासोबतही होऊ शकत नसल्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमी असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केले. सोमवारी ४८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी करून त्यांचा कायापालट करण्यात आला.


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख,लायन्स उप प्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड , लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , सन्मित्र फौंडेशन, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने कायापालट उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो.जेष्ठ समाजसेवक ॲड.सी. बी.दागडिया यांनी उपक्रमाची माहिती दिली.


सोमवारी सकाळी सहा वाजता सुरेश शर्मा,संजयकुमार गायकवाड,शिवा लोट यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून भ्रमिष्ठांना दुचाकी वर गोवर्धन घाट येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आणले. यावेळी भर्मिष्टांची संख्या जास्त झाल्यामुळे राजू अण्णा ,व्यंकटेश,प्रसाद या तीन स्वंयसेवकांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. स्नानासाठी स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्यातर्फे करण्यात आली होती.



कित्येक महिने अंघोळ न केलेल्या या भ्रमिष्टांना साबण लावून स्नान घालण्यात आले.अमर राजूरकर,सुरेश पळशीकर, स्नेहलता जायस्वाल यांच्या हस्ते सर्वांना नविन अंडरपॅन्ट ,बनियन,टी शर्ट, पँट देण्यात आले.स्वच्छ होऊन नवीन कपडे घातल्यामुळे त्यांच्या दिसण्यात अमुलाग्र बदल झाला होता . शिल्पा जायस्वाल यांनी सर्वांच्या चहा फराळाची व्यवस्था केल्यानंतर राजुरकर यांच्या हस्ते प्रत्येकाला शंभर रुपयाची बक्षिसी दिली. डॉ.दी.बा.जोशी,डॉ.अर्जुन मापारे यांनी सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी करून योग्य ते ओषधोपचार केले.


अडीच तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर गोवर्धन घाट परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.योग शिक्षक विलास बिरादार यांनी सदिच्छा भेट दिली.यापुढे असहाय्य दिसणारे, कचरा वेचणारे, वेडे ,भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी याची ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी भाजप अथवा लायन्स सदस्यास माहिती द्यावी असे आवाहन संयोजक ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.


