कंधार, सचिन मोरे | गेल्या दोन दिवसापासून कंधार तालुक्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून संततधार पावसामुळे गाढ झोपेत असलेले पती पत्नीवर भिंत कोसळून ते जागीच ठार झाल्याची ऱ्हदयद्रावक घटना तालुक्यातील कोटबजार येथे घडली असून या वृध्द दाम्पत्याच्या दुर्दैवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


या बाबत कोटबाजार ग्रामस्थांच्या वृतानुसार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम शेख नासेर (वय ६८ वर्ष) व त्यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर शेख अमीन (वय ७२ वर्ष) हे आपले रोजचे दैनंदिन कामकाज आटोपून नेहमी प्रमाणे जेवण करून गाढ झोपेत होते. गेल्या दोन तीन दिवसापासून तालुक्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असून या पावसामुळे नदी नाले यांना प्रचंड प्रमाणात पुर आला आहे. या सततच्या पावसामुळे अनेक नागरिकांची घरे कोसळत आहेत. तर काही ठिकाणी गुरेढोरे देखील वाहून गेल्याचे समजते.


याच पार्श्वभूमीवर सततधार पावसामुळे गाढ निद्रावस्थेत असलेले शेख दाम्पत्यावर कच्या बांधकामातील भिंत कोसळून १६ ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या दरम्यान हे दाम्पत्य ठार झाले. त्यांच्या अंगावर पत्रा वरील दगड पडल्यामुळे त्यांना उठता देखील आले नाही.



या घटनेचे वृत समजताच गावचे सरपंच म. अजिमोद्दिन, उपसरपंच प्रतिनिधी शेख पाशा, पोलिस पाटील प्रतिनिधी मिर्झा यादुल बेग, माजी सरपंच शेख फारुक, एमआयएमचे शेख हब्बु, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, मंडळ अधिकारी एस. आर. शेख, तलाठी परसराम जाधव, ग्रामसेवक मंगनाळे यांच्यासह आजी माजी सदस्यांनी घटनास्थळाला भेट दिली. मयत शेख दांपत्याचे शव विच्छेदन ग्रामीण रुग्णालयात कंधार येथे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आले. मयत शेख दाम्पत्यावर कोट बाजार येथील कब्रस्तानात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.

कोटबाजारमध्ये शोककळा – माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होते. हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी जन सेवेला वाहून घेतले होते. ते व त्यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या हसीना बेगमच्या आकस्मित मृत्युने कोटबाजार व परिसरात शोककळा पसरली आहे.
मयत कुटुंबीयास सर्वोतोपरी मदत करणार – आ. चिखलीकर
या घटनेची विषयी माहिती कळताच प्रस्तुत प्रतिनिधीने लोहा कंधार मतदार संघाचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले : कोटबाजार येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हनी झाली असून त्यांच्या कुटुंबाला मी उघड्यावर पडू देणार नाही. त्यांच्या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


