नांदेडराजकीयलेख

Suryakantatai Patil : मराठवाड्याच्या भुमितिल एक निस्वार्थ,निर्मोही आदर्श नेतृत्व…मा. सूर्यकांताताई पाटील

भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या प्रवाहात काही व्यक्तिमत्व अशी असतात की,जी आपल्या लोकाभिमुख कार्यकर्तृत्वाने,दूरदृष्टीने आणि जनसेवेच्या अपार तळमळीने इतिहासात आपले अढळ स्थान निर्माण करतात.मा.सूर्यकांताताई पाटील मॅडम हे असेच एक तेजस्वी, प्रेरणादायी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात अखंड ऊर्जेच स्त्रोत निर्माण करणारे निर्मोही व्यक्तिमत्व आहे.

एका शेतकरी कुटुंबात पण अन्यायाचा सतत प्रतिकार करणाऱ्या,समाजसेवेचा वारसा घेऊन चालणाऱ्या आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा जयवंतराव पाटील आणि हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या माजी आमदार मातोश्री मा.अंजनाबाई या शूरवीर आई-वडिलांच्या पोटी मा.सूर्यकांताताई साहेबांचा जन्म 15 ऑगस्ट 1948 रोजी, विकासापासून कोसो दूर असलेल्या मराठवाड्यातील, नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातील एका छोट्याशा वायपणा या गावी झाला.

मा.ताईसाहेबांनी शिक्षणानंतर आपल्या कुटुंबीयांनी चालविलेल्या समाजसेवेचा वसा आणि राजकीय कार्याचा वारसा घेऊन चालताना एक पत्रकार,गोदावरी टाईम्स चे संपादक म्हणून आपल्या समाज आणि राष्ट्रसेवेच्या कार्याला प्रारंभ करून आपल्यातील विद्वत्तेने,कर्तुत्वाने,सेवाभावी वृत्तीने, कणखर नेतृत्व, भाषेवरील प्रभुत्वाने आणि स्वसामर्थ्याच्या बळावर देशाच्या केंद्र सरकारमध्ये केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री मंत्री पदापर्यंतचा प्रवास अतिशय यशस्वीपणे पार केला.

मा.ताईसाहेबांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या माध्यमातून गोरगरीब जनतेशी संवाद साधत,त्यांच्या समस्या समजून घेत नांदेड, नगर परिषदेतील नगरसेविका पासून सुरू केला. त्याठिकाणी त्यांनी स्थानिक विकास कामे, सामाजिक न्याय,महिला व बालकल्याण यावर विशेष लक्ष केंद्रित करून त्यासंबंधीत समस्या सोडविण्यासाठी संघर्ष केला.त्यांच्या अंगी असलेल्या धाडसी स्वभावामुळे, नेतृत्वगुणामुळे,सामाजिक बांधिलकीमुळे आणि त्यांच्या अविश्रांत कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावरील पक्षाच्या जबाबदाऱ्या वाढल्या.

आणीबाणीच्या परिस्थितीनंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या मा.इंदिरा गांधी नांदेडला आल्या त्यावेळी मा.ताईसाहेबांची वैचारिक प्रगल्भता,निर्भीडपणा आणि अमोघ वाणी,अभ्यासू वृत्ती व भाषेवरील प्रभुत्वामुळे.इंदिराजींच्या नजरेत मा.ताईसाहेबाची एक चागंली प्रतिमा निर्माण झाली.पुढे काँग्रेस पक्षाकडून हदगाव हिमायतनगर विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी स्वतः मा.इंदिरा गांधींचा आग्रह होता,असे म्हटले जाते.आणि काँग्रेस पक्षाकडून मा.सूर्यकांता ताईंनी आपल्या जन्मभूमीतून पहिली विधानसभेची निवडणुक लढवून प्रचंड मतांनी विजय मिळवला.इ.स.1980 ते1985 पर्यंत त्यांनी आमदार म्हणून महाराष्ट्रच्या विधानसभेत हदगाव हिमायतनगरचे प्रतिनिधित्व केले.

आजोबा नंतर आई आणि आई नंतर मुलगी एकाच मतदारसंघातून निवडून येऊन आमदार होण्याचा त्रिविक्रम या देशात मा.सूर्यकांताताई साहेबांच्या नावावर नोंदविला गेला. त्यावेळी त्यांच्या पाठीशी कोणतीही कौटुंबिक भक्कम शक्ती उभी नव्हती हे विशेष आहे.हदगाव,हिमायतनगर सारख्या मागास व बहुजनबहुल मतदार संघातून निवडून येत त्यांनी येथील समाजाच्या व्यथा.आणि ग्रामीण भागाचा विकास तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला. इ.स.1986 ते 1991 या कालावधीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. राष्ट्रीय स्तरांवर महिला सबलीकरण आणि ग्रामीण विकासाच्या संदर्भात असंख्य प्रश्न राज्यसभेत मांडले.त्यानंतर नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविली आणि भरघोस मतांनी विजयी होऊन इ.स.1991 ते 1996 काळात खासदार म्हणून लोकसभेचे सदस्य या नात्याने संसदेत नांदेड जिल्ह्या बरोबरच मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

या काळात मराठवाड्याचा शैक्षणिक विकास,विशेषतः बहुजन महिलांचे शिक्षण,स्वावलंबन,स्व-सहायता गट,सहकारी संस्था तसेच ग्रामीण आरोग्य इत्यादी क्षेत्रातअनेक प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला. इ.स.1998 ते 1999 या कालावधीत हिंगोली लोकसभेचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आणि महिला सबलीकरण, जलसंधारण तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविला.इ.स.1999 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस मध्ये फुट पडली आणि मा.शरद पवार साहेबांनी 10 जून 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली.त्यावेळी मा.ताई साहेबांनी मा.पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इ.स.2004 ते 2009 या कालावधीत हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले.

इ.स.2004 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार केंद्रात आले आणि मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले.त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मा.ताई साहेबांचे कार्यकर्तृत्व आणि राजकारणातील अनुभव लक्षात घेऊन अखेर केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली गेली.केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना दिलेल्या खात्याचा कारभार अतिशय पारदर्शकपणे निष्ठेने आणि प्रभावीपणे हाताळला.संसदेत ग्रामीण भागाचे वास्तव अधोरेखित करून त्यांनी सुरू केलेल्या योजना आणि सरकारची मदत सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविली.

शेतकरी,ग्रामीण विकास,सिंचन,रस्ते,घरकुल योजना, शेततळ्यांचे महत्त्व,महिला सबलीकरण, इत्यादी क्षेत्रात त्यांच्या पुढाकाराने अनेक ठोस बदल आणि परिवर्तन घडून आले.त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या योजना केवळ आकड्यापुरत्या मर्यादित नव्हत्या तर त्यांचा खरा लाभ तळागळातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचला.

त्यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न,पायाभूत सुविधा,महिला आणि युवा सक्षमीकरण याबाबत वेळोवेळी आवाज उठविला.कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी स्वतंत्र योजना राबवाव्यात यावर संसदेत मुद्दाम चर्चा करून शेततळे,पाणलोट क्षेत्र विकास योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली.ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अंतर्गत रस्त्याचे कामे वेळेवर व गुणवत्ता पूर्ण व्हावीत याकडे लक्ष दिले,दुर्गम व आदिवासी भागातील रस्ते,वीज,आरोग्य केंद्र या बाबत मंत्रालयाशी थेट पाठपुरावा केला,महिलांच्या प्रश्नाबरोबरच शेती आणि शेतकरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.

शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी धोरणे व्हावीत.खताच्या दरावरील नियंत्रण आणि अनुदान वितरणात पारदर्शकता यावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.गावपातळीवरील सशक्तीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत निधी थेट गावकऱ्यांच्या नियंत्रणाखाली असावा हा मुद्दा संसदेत वेळोवेळी मांडला.त्याबरोबरच गावात मुला मुलींसाठी स्वतंत्र शाळा,वस्तीग्रह,स्वच्छतागृहे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले,तसेच डिजिटल साक्षरतेसाठी आय टी हब्स, ई-लर्निंग केंद्र ग्रामीण भागात सुरू करण्याची शिफारस म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीचा जणू परिचय होता.

मा.सूर्यकांताताई पाटील मॅडम यांचे ग्रामीण विकास विषयावरील विचार फक्त टीका करणारे नसून रचनात्मक सूचना देणारे आहेत. त्यांनी शेतकरी, महिला,वंचित वर्ग यांच्यासाठी नीती आधारित आणि लोकाभिमुख बदलाची मागणी केली.त्यांनी संसदेमध्ये ओ बी सी, दलित, शेतकरी, महिला आणि आदिवासी यांच्यासाठी वैयक्तिक आणि संघटित प्रश्न मांडले, शेतकरी आणि मजूर वर्गासाठी संघर्ष केला. विशेषतः बहुजन समाजाचा मोठा हिस्सा हा शेतकरी,शेतमजूर आणि कष्टकरी वर्गात मोडतो त्यांच्यासाठी त्यांनी शेतीमालाच्या भावासाठी आवाज उठविला.नांदेड व मराठवाड्यात जलसंधारण व सिंचन प्रकल्पासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न केला.

त्याबरोबरच बहुजन समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी त्यांनी सहकारी संस्था साखर कारखाना आणि शिक्षण संस्था स्थापन केल्या.खरेतर महाराष्ट्रातील साखर कारखाने हे राजकारणाचे प्रवेशद्वार मानले जातात,परंतु आदरणीय सूर्यकांतताई पाटील मॅडम यांनी राजकारण बाजूला ठेवून हादगाव हिमायतनगर सारख्या मागास आणि दुर्लक्षित भागातील शेतकरी,शेतमजूर आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाला पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना स्थापन केला.

आपल्या वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या कारखान्यास त्यांनी आपले अपत्य मानले हा कारखाना म्हणजे या भागातील शेतकऱ्यांचा जणू कामधेनूच होता, परंतु राजकारणी लोकांनी सुड बुद्धीचे राजकारण करून या कारखान्यापासून मला दूर केले, माझ्याकडून कारखाना काढून घेतला अशा स्पष्ट भावना मा. ताईसाहेब आपल्या भाषणातून व्यक्त करतात…..

मा. सूर्यकांता ताई पाटील मॅडम यांचे शैक्षणिक कार्य देखील प्रेरणादायी आहे. त्यांनी मोठ मोठ्या शहरांमध्ये शाळा महाविद्यालय स्थापन केले नाही तर, शैक्षणिक विकासापासून दूर असलेल्या ग्रामीण, मागास व आदिवासी भागातील गाव,वाडी तांड्यावरच्या दुर्लक्षित, गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मा. ताई साहेबांनी मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना इ.स1987 मध्ये केली. या संस्थेच्या माध्यमातून हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळेची इ.स 1987मध्ये हिमायतनगर येथे सुरुवात केली.त्यानंतर ज्युनियर कॉलेज आणि वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करून बहुजनांच्या मुलाबाळांना प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाची व्यवस्था केली.

याबरोबरच हिमायतनगर तालुक्यातील खडकी, हदगाव तालुक्यातील ताई साहेबांच्या मूळ गावी वायपणा येथे आणि किनवट तालुक्यातील दहेली आणि कणकी या ठिकाणी शाळा स्थापन करून गोरगरीब आदिवासींच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिले.याशिवाय नांदेड सारख्या ठिकाणी स्वतंत्र मुलीचे अध्यापक महाविद्यालय स्थापन करून हजारो मुलींचे शिक्षीका होण्याचे स्वप्न पूर्ण केले.त्यांनी या शैक्षणिक संस्थेकडे उत्पन्नाचे साधन म्हणून कधीच पाहिले नाही. या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आदरणीय ताई साहेबांचे निस्वार्थ,आदर्श आणि पवित्र शैक्षणिक कार्य अविरतपणे सुरू आहे.

मा. ताईसाहेब म्हणजे नांदेडच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेले एक संवेदनशील,सर्जनशील अष्टपैलू साहसी व्यक्तिमत्व,एक दैदिप्यमान तारा म्हटले तर कदापी वावगे ठरणार नाही.त्यांची खरी ताकद म्हणजे त्यांचा निस्वार्थपणा,निर्मोही स्वभाव,ओजस्वी वक्तृत्व, कणखर बाणा,वैचारिक प्रगल्भता, स्पष्टवक्तेपणा आणि अभ्यासपूर्ण जनतेशी संवाद कोणत्याही पदावर काम करत असताना कोणत्याही प्रसंगी,कोणत्याही वेळी अचूक व स्पष्ट मार्गदर्शन ही त्यांची विशेष खासियत आहे.तळागळातील सामाजिक व आर्थिक बहुजन मागास घटकांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे महान व्यक्तिमत्व म्हणून जनतेच्या हृदयात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत ग्रामीण भागातील प्रश्न समजून घेण्यासाठी अगणित वेळा थेट गाव खेड्यात, वाडी-तांड्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून लोकांच्या भावना,अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला योग्य वेळी योग्य त्या सूचना देऊन, वेळप्रसंगी शासनाच्या अधिकाऱ्यांनाही सज्जड इशारा देण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही.मा.ताईसाहेब यांच्यातील सौजन्यशीलता,संवेदना आणि कृतिशील वृत्तीमुळे त्या नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हृदयात राहिल्या.आजच्या सामाजिक आणि तरुण राजकीय नेतृत्वासमोर मा. ताईसाहेब म्हणजे एक आदर्श उदाहरण आहेत.

स्वच्छ,निर्मळ आणि निर्मोही राजकारण, तळागाळातील लोकांची अविरत सेवा आणि स्पष्ट धोरणात्मक दृष्टिकोन,तसेच सत्तेसाठी राजकारण आणि राजकारणासाठी सत्ता या धोरणाचा स्वतःला स्पर्शही होऊ दिला नाही तर, राजकारणाचा वापर सत्तेसाठी न करता त्या माध्यमातून केवळ समाज हित कसे साधता येईल याचे उत्तम उदाहरण आजच्या राजकीय नेते मंडळी आणि तरुणासमोर निर्माण केले. मा.सूर्यकांता पाटील यांचे योगदान फक्त राजकारणापुरते मर्यादित नाही, तर ते एक समर्पित सामाजिक कार्य आहे.बहुजन समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी त्यांनी दीर्घ काळ प्रयत्न केले आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी सतत आवाज उठवला.

मा.ताईसाहेबांचे जीवन कार्य हे आजच्या तरुणाईसाठी आणि समाजासाठी एक उगमबिंदू आहे.त्यांच्या कार्यकर्तृत्वात अनेक नव्या दिशा मिळतात.त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज हितासाठी प्रयत्नशील राहू.आपल्या अविरत, अविश्रांत,निस्वार्थ,निर्मोही कार्याला मानाचा मुजरा आपणास निरोगी,निरामय आणि उदंड आयुष्य लाभो आपल्या सर्जनशीलतेचा प्रकाश दाहीदिशांत पडो सदिच्छासह अनंत शुभेच्छा….
समुद्र कधीच थकत नसतो….
हिमालय कधीच झुकत नसतो…..
याची साक्षात प्रचिती…..
म्हणजे आमच्या आदरणीय ताई ……
सूर्यकांताताई पाटील…

लेखक… प्रा.डॉ.वसंत कदम, पदवी व पदव्युत्तर इतिहास विभाग प्रमुख, हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर, जी.नांदेड.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!