नांदेड| महापारेषण मधील चार वरिष्ठ अधिकारी निलंबित झाले आहेत. केवळ चार नाही तर आणखी किमान चाळीस भ्रष्ट अधिकारी निलंबित नाही तर बडतर्फ करावेत अशी मागणी अखिल भारतीय बहुजन समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली आहे.


विद्युत सहाय्यक भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या कारणावरून महापारेषण विद्युत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजीवकुमार यांनी मुख्यालयातील मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सुगत गमरे, महाव्यवस्थापक मंगेश शिंदे, उपमहाव्यवस्थापक अभय रोही आणि वरिष्ठ व्यवस्थापक संदिप धाबर्डे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. डाॅ. संजीवकुमार यांच्या या तात्काळ कारवाईचे अ. भा. बहुजन समता परिषदेने स्वागत केले असून या भरती प्रकरणी आणखी व्यापक चौकशी करुन मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता कार्यालय स्तरापर्यंत पसरलेली भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढून आणखी जवळपास चाळीस भ्रष्ट अधिकाऱ्यांना केवळ निलंबित नाही तर बडतर्फ करुन घरचा रस्ता दाखविण्यात यावा अशी मागणी अ. भा. बहुजन समता परिषदेने लेखी निवेदनातून केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल व ऑनलाईन पोर्टलवर पाठविलेल्या निवेदनात अ. भा. बहुजन समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी महापारेषण विद्युत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजीवकुमार यांचे अभिनंदन केले असून वर्षानुवर्ष एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेले श्री सुगत गमरे व त्यांची मानव संसाधन विभागाची टीम भ्रष्टाचारात आकंठ बुडाली होती. विद्युत सहाय्यक भरतीतून त्यांचा भरत आलेला पापाचा घडा फुटला. आणखी सविस्तर चौकशी होऊन भरतीपासून ते नियुक्तीपर्यंत होत असलेल्या विभागीय कार्यालयापर्यंतच्या भ्रष्टाचाराचीही चौकशी करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


विद्युत सहाय्यक हे कायम स्वरुपी कर्मचारी नसून तीन वर्षापर्यंत अल्पशा मानधनावर काम करण्यास तयार झालेले मजबूर युवक असून त्यांच्या नियुक्तीपासून ते पदस्थापनेपर्यंत भ्रष्टाचार होत आला आहे. यासाठीच परिमंडळाच्या बाहेर नियुक्त्या देऊन नंतर हव्या त्या ठिकाणी पदस्थापना देऊन पैसे उकळण्याचा बेत आखण्यात येत असतो. याचीही चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


