नांदेड, अनिल मादसवार| मध्य प्रदेशातील बियाणं कमी पैशात बाजारात विक्रीसाठी आल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती. बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र आठ दिवस झाले तरी बियाणे उगवले नाही. त्यामुळे थडी सावरगाव येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे बोगस बियाणे असल्याच्या तक्रारी कृषी अधिकाऱ्याकडे केल्या असून, त्यावरून आता चौकशी सुरू झाली आहे.


मागील बारा वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशीची नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात लागवणं करत होते. परंतु कपाशीचे महाग बियाणे, खते, औषधी, फवारणी, वेचणीचे खर्च आणि मिळणारा भाव याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड सुरू केली आहे. मात्र सोयाबाईंच्या बियाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगसपणा दिसून येत असल्याने शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे.


देगलूर तालुक्यातील मौजे थडी सावरगाव येथील शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून आलेल्या परम आणि उत्तम बियाण्याची खरेदी केली. मात्र हेच बियाणं बोगस असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. आम्हाला नुकसान भरपाई द्यावी तसेच दुबार पेरणीसाठी आता आम्हाला नवीन बियाणे मोफत द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्याशी विचारना केली असता आमच्याकडे लेखी तक्रार आली आहे. आम्ही चौकशी सुरू केल्याचं त्यांनी सांगितले असून, सदोश बियाणे आढळल्यास त्याचावर कारवाई करू असे यांनी सांगितले.



सनियंत्रण समितीकडून चौकशी
दरम्यान हिमायतनगरमध्ये ५१, नायगाव ३, भोकर १, उमरी १ व देगलूर मधील काही शेतकर्यांनी सोयाबीनच्या बियाणांची उगवन न झाल्याच्या लेखी तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे आल्या आहेत. याप्रकरणी तक्रार निवारन सनियंत्रण समिती क्षेत्रीय भेट करत असून, चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा कृषी अधीक्षक दत्ताकुमार कळसाईत यांनी सांगितले.

