
नांदेड| श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात विहाराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. भदंत पंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर धम्म प्रसाराचे कार्य होत आहे.


श्रामणेर दीक्षा घेऊन धम्मचळवळीला योग्य दिशेने घेऊन जात आहेत. हे केंद्र मैलाचा दगड ठरले असून या परिसरात उपासक उपासिकांसाठी बौद्ध संस्कारांचे केंद्रबिंदू बनले आहे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो आणि ६० श्रामणेर भिक्खू संघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, ध्यानसाधना, भोजनदान आदी कार्यक्रम संपन्न झाले. मुख्य समारंभात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. भिक्खू संघावर पुष्पवृष्टी करण्यात आली. उपासकांच्या याचनेवरुन भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. तसेच त्रिरत्न वंदना घेण्यात आली आणि अष्टशील, दसशील देण्यात आले. दहा मिनिटे आनापान ध्यानसाधनाही झाली.


यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. शेवटी भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. दरम्यान, कामाजी पवार यांच्या हस्ते भिक्खू संघास चिवरदान करण्यात आले. यावेळी बोधीवृक्षास जलसिंचन करुन वृक्ष संवर्धनाचे महत्व त्यांनी कृतीतून दाखवून दिले. भिक्खू संघाच्या आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका आणि बालक बालिका यांची उपस्थिती होती.




