Wednesday, May 13

Graduation ceremony ; श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न

नवीन नांदेड l गुणवत्तापूर्ण, तांत्रिक व मूल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेचा पदवी वितरण समारंभ अत्यंत भव्य,प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदव्या प्रदान करून त्यांच्या चार वर्षांच्या कठोर मेहनतीचा गौरव करण्यात आला.

समारंभाची सुरुवात संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून निघालेल्या भव्य मिरवणुकीने झाली,पदवी पोशाखात सजलेले विद्यार्थी,मान्यवर,अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, तसेच विद्यापीठाचा ध्वज घेऊन निघालेली ही मिरवणूक संपूर्ण परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण करणारी ठरली. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते विष्णुपुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचे पारंपरिक पोशाखातील बँड आणि लेझीम पथक.

IMG 20250423 WA0005 1 scaled Graduation ceremony ; श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न

सभागृहात दीपप्रज्वलन करून समारंभाचा औपचारिक प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी रायठठ्ठा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सरोज देशपांडे (अवर सचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई) व मुख्य अतिथी म्हणून हुशारसिंग साबळे (संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ स्वा.रा.ती.म.विद्यापीठ यांच्या सहसंस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे, राजश्रीताई हेमंत पाटील, संत बाबा सुखविंदरसिंघजी, डॉ. धर्मपाल डोये, डॉ. जे. व्ही. मेघा (सदस्य, नियामक मंडळ), डॉ. अनिल गोंडे (अधिष्ठाता – शैक्षणिक), प्रा. संजय देठे (अधिष्ठाता-विद्यार्थी कल्याण), डॉ. अभिजित नांदेडकर (अधिष्ठाता-संशोधन व विकास), डॉ. प्रशांत देशमुख (परीक्षा नियंत्रक, एस.जी.जी.एस.), तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात विविध विभागांतील गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली.

केमिकल विभागातील श्रुती सिंग हीला “संस्थेचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार” बहाल करण्यात आला. विभागात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या व्यंकटेश सावंत, प्रणव उमाक, मोक्षदा चौधरी, मोझान चौधरी,जयंत मोरे, सायली जोशी, रामान खोनारकर, कल्याणी देशमुख आणि आकाश पवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित एकूण २२० विद्यार्थ्यांना संगणक, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, प्रोडक्शन, टेक्स्टाईल आणि माहिती तंत्रज्ञान या शाखांमधून अभियांत्रिकी स्नातक व पदवीत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या.

या कार्यक्रमा दरम्यान प्रयोगशाळेतील अनुभव, प्रकल्प सादरीकरणे आणि उद्योग प्रशिक्षणाचे यश त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते. काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व संस्थेच्या सकारात्मक वातावरणाचे कौतुक केले.
सरोज देशपांडे यांनी आपल्या भाषणात तांत्रिक शिक्षणासोबत मानवीय मूल्यांची जोड अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करत, विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख आणि जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले.

हुशारसिंग साबळे यांनी विद्यापीठाची गौरवशाली परंपरा, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर प्रकाश टाकत पदवी संपादन हे केवळ औपचारिक प्रमाणपत्र न राहता, जबाबदारीची सुरुवात असल्याचे प्रतिपादन केले.सुनीलजी रायठठ्ठा यांनी विद्यार्थ्यांना “नोकरी मागणारे न होता, नोकरी देणारे बना” असे प्रेरणादायी आवाहन करत उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली.

राजश्रीताई हेमंत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःच्या यशापुरते मर्यादित न राहता, समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे सांगत सामाजिक जाणीव जागृत ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले. संत बाबा सुखविंदर सिंघजी यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत,आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे संदेश दिला. डॉ. मनेश कोकरे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेतला. संशोधन, स्टार्टअप्स, उद्योग-संस्था समन्वय आणि समाजाभिमुख उपक्रमांमधील संस्थेच्या योगदानावर प्रकाश टाकला.

संस्थेने राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण निर्माण केले आहे, असे त्यांनी विशेष नमूद केले. तसेच त्यांनी पदवीधरांनी केवळ कुशल अभियंतेच नव्हे, तर जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनण्याचे आव्हान केले. विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी शिक्षक, पालक आणि संस्थेच्या भूमिकेचे कौतुक केले आणि भावी वाटचालीसाठी आत्मविश्वास, चिकाटी व सातत्य राखण्याचा सल्ला दिला.

डॉ. शिल्पा चव्हाण यांनी कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन केले.तर विणा सुर्यवंशी व निशा निहलानी यांनी पदवी प्रमाणपत्र वितरणाचे सूत्रसंचालन केले. डॉ.प्रशांत देशमुख यांनी समारंभाचे प्रास्ताविक केले, तर डॉ. तेजस भटकर यांनी प्रमुख पाहुणे, मान्यवर, शिक्षकवर्ग, पालक, विद्यार्थी आणि परीक्षा विभागाचे कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

समारंभानंतर पदवीधर विद्यार्थ्यांसाठी छायाचित्र सत्र व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांच्या आनंदाने, पालकांच्या अभिमानाने आणि शिक्षकांच्या समाधानाने भारावून गेलेला होता. हा सोहळा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला, जो त्यांना आयुष्यभर सकारात्मक उर्जा व प्रेरणा देणारा ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!