किनवट, परमेश्वर पेशवे| शेतकऱ्यांची मतं काढून घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आज मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करता येणार नाही अशी विधाने केली जात आहेत. सरकारने केलेला शेतकऱ्यांचा हा पुन्हा एकदा नवा विश्वासघात आहे. सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे यांनी केली आहे.


माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी इतके मोठे अंथरूण राज्य सरकारचे सध्या नाही, असे विधानही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याएवढे मोठे अंथरूण राज्य सरकारचे नव्हते याची जाणीव निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन देऊन मते पदरात पाडून घेतेवेळी नव्हती का ? असा प्रश्न किसान सभेने केला आहे.


या वर्षी व पुढील वर्षी तरी कर्जमाफीची शक्यता नाही, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कालांतराने कर्जमाफीचा निर्णय घेऊ असेही अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती राज्य सरकारला आणि तमाम यंत्रणांना माहीत आहे. त्यामुळे प्रश्न शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कर्जमाफी करण्याचा नसून मतांची बिदागी मिळवण्यासाठी निवडणुकीचा हंगाम पाहून जमले तर कर्जमाफी करण्याचा हा मुद्दा आहे. निवडणुकांसाठी आणि मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवाशी होत असलेला खेळ सत्ताधाऱ्यांनी थांबवावा असे आवाहन किसान सभेने केले आहे.


सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथ्यावर झालेल्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी सुद्धा सरकारची आहे. सरकारने आपली जबाबदारी स्वीकारावी, मतांसाठी निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तत्काळ करावी अशी मागणी किसान सभा नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने शंकर सिडाम, किशोर पवार,खंडेराव कानडे, शेषराव ढोले, आडेलू बोनगीर, प्रल्हाद चव्हाण, अमोल आडे, मनोज सालवार, तानाजी राठोड, शिवाजी किरवले, मुसा भाई आदीनी केली आहे.



