Wednesday, May 13

Kinwat Sushant Thamke ; किनवटचा सुशांत ठमके झळकणार मोठ्या पडद्यावर ! 21 मार्च रोजी देशात सर्वत्र प्रदर्शित होणार

किनवट, परमेश्वर पेशवे। जिद्द, आवड व मेहनतीच्या बळावर चक्क फिल्मी दुनियेच्या क्षेत्रामध्ये मोठी मजल मारत हिरो बनण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून गोकुंदा, किनवट येथील सर्वपरिचित असलेले इंजि. प्रशांत ठमके यांचे चिरंजीव उदयास येत आहेत. ज्येष्ठ अभिनेता अक्षय कुमार यांचे हस्ते त्याच्या ‘पिंटू की पप्पी’ या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले आहे.

सदर चित्रपट 21 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून किनवट तालुक्यातील भूमिपुत्र सुशांत ठमके याचे हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेता बनण्याचे स्वप्न साकार होत आहे. परिणामी किनवट/माहूर सहित जिल्ह्यातील प्रेक्षकांची चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचत आहे.

सविस्तर वृत्त असे की, सदर चित्रपट इमोशन, ॲक्शन, कॉमेडी आणि रोमान्सने भरगच्च भरलेला असल्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडणार अशी खात्री निर्माता विधी आचार्य यांनी सूत्राकडे दिली आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणारा सुशांत ठमके याच्या अभिनयाचे जेष्ठ अभिनेता अक्षय कुमार आणि निर्माता दिग्दर्शकांनीही कौतुक केले आहे. अफाट मेहनत, जिद्द आणि अभिनयाच्या बळावर सुशांत इथपर्यंत पोहोचला आहे. सराव विधी आचार्य यांच्या स्टुडिओमध्ये झाले असून ‘पिंटू की पप्पी’ या चित्रपटाचे निर्माता, डायरेक्टर यांनी सुशांतच्या अभिनयाबद्दल व त्याच्या जिद्द, मेहनत करण्याची पुरेपूर तयारी याबद्दल प्रशंशा केली आहे. चित्रपटाची प्रमुख नायका म्हणून दिल्ली येथील जान्या जोशी दिसणार आहे.

चित्रपटाचे चित्रीकरण प्रसिद्ध अशा मोठ्या स्टुडिओच्या ठिकाणी करण्यात आले आहे. प्रमुख नायकाला शोभेल अशीच नायीका निर्मात्याने निवडली अन् दिल्ली येथील जान्या जोशी यांना नायकाचे पात्र देण्यात आले आहे. आणि सुशांत ठमके चे अभिनेता बनण्याचे स्वप्न मी जवळून पाहिले तो माझ्या स्टुडिओमध्ये मला भेटण्यासाठी आतुर झाला होता. पण त्याची भेट होताच मी त्याला ‘हाच हिरो’ म्हणून निवड केली, अन् त्याची योग्य ती तयारी करून घेतली. त्यात तो पात्र ठरला असे गौरवोद्गार निर्माते आचार्य यांनी सूत्राकडे मांडले. सदर चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार यांचे जवळचे मित्र असल्याचे सूत्रांना सांगण्यात आले.

सदर चित्रपटात विजय राज, मुरली शर्मा, पूजा बॅनर्जी, सुनील पाल, अली असगर, अजय जाधव, अदिती सनवाल, रिया एस सोनी, उर्वशी चव्हाण, प्युमोरी मेहता दास, मुक्तेश्वर ओझा, आणि गणेश आचार्य सारखे प्रसिद्ध अनुभवी सह कलाकारांनी काम केले आहेत. तालुक्यातला भूमिपुत्र सुशांत ठमके याला सिनेसृष्टीमध्ये भरपूर यश मिळो अशा शुभेच्छा किनवटकरांकडून देण्यात येत आहेत. “पिंटू की पप्पी” हा चित्रपट येणाऱ्या 21 मार्च पासून सर्व देशात प्रदर्शित होत असून प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत असलेला सुशांत ठमके याचा हा पहिला चित्रपट मोठ्या पडद्यावर किती यशस्वी ठरतो आणि प्रेक्षक किती दाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!