Thursday, May 14

Violent protests : उमर कॉलनी मस्जिद जवळ मोबाईल टॉवर उभारण्यात येऊ नये म्हणून मनपा समोर तीव्र निदर्शने

नांदेड| दि. ४ जानेवारी रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके समोर देगलूर नाका परिसरातील उमर कॉलनी येथील नागरिकांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) च्या झेंड्याखाली दुपारी तीव्र निदर्शने केली.

सलमा फारशी मस्जिद जवळ केवळ १५ फुटाच्या अंतरावर एका तीन मजली इमारतीवर नेटफ्रा सोल्युशन प्रा.लि.मुंबई या कंपनी मार्फत मोबाईल टॉवर बसविन्याचे काम बेकायदेशीररित्या सुरु आहे. दि. २६ डिसेंबर रोजी स्थानिक नागरिकांनी हरकत घेत भविष्यातील धोका लक्षात घेऊन विरोध असल्याचे निवेदन महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांना देण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे यांनी परवानगी नसल्याचे लेखी स्वरूपात यापूर्वीच कळविले आहे. परंतु त्यास न जुमानता टॉवर बसविन्याचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रचंड विरोध असताना काम सुरु असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी माकप व सीटू च्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. निदर्शने करून अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांना निवेदन देण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त कदम यांनी शिष्टमंडळास दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. ते म्हणाले संबंधित टॉवर बस्वीन्याच्या कामास स्थगती देण्यात आली असून विद्युत विभागाने परवानगी देऊ नये तसेच वीज जोडणी देऊ नये यासाठी त्यांना कळविले आहे. कुठल्याही परिस्थितीत तेथे मोबाईल टॉवर बसविण्यात येणार नाही अशी ग्वाही श्री कदम यांनी आंदोलकांना दिली.

तसेच ज्या इमारतीवर टॉवर बसविण्यात येत आहे त्या इमारतीस बांधकाम परवानगी आहे काय, त्यांनी पूर्ण टॅक्स भरला काय हे देखील तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इमारतीचे मालक आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या देत असून योग्य कारवाई करण्याचे निवेदन पोलीस अधीक्षक श्री अबीनाश कुमार यांना प्रत्यक्षात भेटून शिष्टमंडळाने दिले आहे.

या निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, स्थानिक नागरिक शेख महेबूब, अब्दुल अफरोज, अब्दुल जहीर, म.जावेद, म.अस्लम, अब्दुल रहीम, खाजा खान, मजीद कुरेशी, रिजवान कुरेशी, अमजद खान, शेख कादर, सयद जावेद शबीर खान, अब्दुल रौफ, शेख अकबर, सयद सलीम, शहाणाज बेगम, फातेमा बेगम, सलीम चौधरी आदींनी केले तर कॉ. जयराज गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ. अजिजूर रहेमान, कॉ. रमेश गायकवाड, कॉ. बालाजी भोसले पाटील, कॉ. व्यंकटी डोंपले, कॉ.मंगेश वट्टेवाड,कॉ. गंगाधर खुणे आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली असून मागण्या प्रमाणे कारवाई झाली नाही तर पुढील आठवड्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महेबूब शेख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!