नांदेड| भारत निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज 30 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. उद्या सकाळी 11 वा. छाननीला सुरूवात होईल. छाननी प्रक्रियेनंतर उमेदवारांना 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळापत्रकानुसार उद्या बुधवार 30 ऑक्टोबर रोजी छाननी केली जाणार आहे. छाननीचे काम लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर विधानसभेसाठी त्या-त्या स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेतला जाऊ शकते. त्यामुळे छाननी नंतर व 31 ऑक्टोबरला अर्ज परत घेतल्या जाऊ शकतात. येणाऱ्या काळात शासकीय सुट्ट्या असल्यामुळे उद्या छाननी झाल्यापासून तर 31 ऑक्टोबरला पूर्ण दिवस व 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. 4 नोव्हेंबरला दुपारी 3 पर्यंतच अर्ज परत घेता येणार आहे.
20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला लोकसभा पोटनिवडणुकीतील 6 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात तर जिल्ह्यातील लोहा, हदगाव, किनवट या मतदारसंघातील मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे. लोहा विधानसभेसाठी महसूल हॉल तहसिल कार्यालय लोहा येथे तर हदगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी समाज कल्याण भवन येथे अनुसूचित जाती मुलींचे शासकीय वसतिगृह तामसा रोड हदगाव येथे होणार आहे. किनवट विधानसभेसाठी येथील आयटीआय कॉलेज येथे मतमोजणी होणार आहे.