अंगावर वाहन टाकून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
हिमायतनगर पोलिसांनी घेतलं चौघा जणांना ताब्यात; तीन दिवसाची पोलीस कस्टडी
तेलंगणात फरार झालेल्या आरोपाच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या तेलंगणा बॉर्डरवरील वाशी नाकाबंदी बंदोबस्तात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात घेऊन भरधाव वेगात गोवंश वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या वाहनाचा पाठलाग करून अखेर पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले. काही गोतस्करी करणारे आरोपी फरार झाले असून, हिमायतनगर पोलिसांचं एक पथक आरोपींना शोधात रवाना करण्यात आले आहे. हि घटना दिनांक २६ च्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातून वाशी मार्गे तेलंगणा राज्यात मागील अनेक वर्षांपासून गोवंशाची तस्करी रात्रीच्या अंधारात केली जाते. गोवंशाच्या कत्तलीवर बंदी असताना देखील निर्दयीपणे गोवंशांना वाहनात कोंबून राजरोसपणे तस्करी करणारे वाहन हिमायतनगर शहरातून भरधाव वेगात चालविले जातात, त्यामुळे अनेकदा रस्त्याने चालणाऱ्या वाहनधारकासह पादचारी नागरिकांना जीव मुठीत धरून बाजूला व्हावे लागते याचा अनुभव सकाळच्या प्रहरी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना आला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजे दिनांक 26 रोजीच्या सकाळी 4 वाजेच्या सुमारास असाच कांहींसा प्रकार हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाल्याने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा – महाराष्ट्र बॉर्डरवर असलेल्या मौजे वाशी येथे पोलिसांची नाकेबंदी लावण्यात आली आहे.
येथून येणाया जाणारी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात असताना विदर्भातील ढाणकी येथून गोवंशाची तस्करी तेलंगणा राज्यात करणारे तीन वाहने भरधाव वेगत येत होती. वाशी येथे पोलिसांची नाकेबंदी तपासणी सुरु असताना पोलीस पोहेकॉ अतिष राचलवार यांनी भरधाव वेगात येणाऱ्या 3 टेम्पो वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता 2 मोटार सायकली 4 इसमानी ताब्यातील मोटरसायकल भरदार वेगात चालून अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोवंश घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाने पोलिसांनी लावलेले बैरिकेट उडवून देऊन पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून स्वतःला बाजूला केलं असले तरी यात तो जखमी झाले आहे.
शासकीय कामात अडथळा निर्माण करत धुडघूस घालणाऱ्या गोतसकाराच्या वाहनांना पकडण्यासाठी लागलीच पोलसानी भरधाव वेगातील तीनही वाहनाचा व दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. दरम्यान तेलंगणा हद्दीत पळून जाणाऱ्या वाहनांपैकी एक वाहनाचे टायर फुटल्याने टेम्पो क्रमांक MH 29 BE 2463 डोडरना जवळ पलटी झाले. पोलिसांनी पलटी झाली त्यातील गुरे आजूबाजूला पडून जखमी झाली. या वाहनासह 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अन्य वाहनासह काही आरोपी फरार झाले आहेत. गोवंशाची निर्दयपणे वाहतूक करताना पलटी झालेल्या वाहनातील 2 जनावरे जखमी झाले असून, काही जनावरे जंगलात निघून गेली येथे असलेली एकूण 11 गोवंशांना गोशाळेत ठेवण्यात आले आहे.
घटनेची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपअधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी शफकत आमना यांना देण्यात आली असून, पोलीस कर्मचाऱ्यास शासकीय कर्तव्यापासून धाकाने परावर्तन करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत करून जोराने बॅरिकटिंग तोडून नुकसान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी आरोपी शेख शौकत शेख मिया वय 30 वर्ष, शेख शोएब अब्दुल वय 34 वर्ष, शेख सिद्दिकी शेख नन्नू वय 24 वर्ष, शेक दावेत शेख इमाम वय 20 वर्षे राहणार ढाणकी, तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या गोवंश तस्करी करणाऱ्यावर कलम 109, 121(1) 324 (4)3 (5) बी एन एस सहकालम 13, 11, (1) (अ) (इ) (फ) कलम 5 (ए) 5 (बि) 47(अ) 48, 50, 56 सी सहकलम 135 मोटार वाहन कायद्याच्या अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार हिमायतनगर पोलिसांचे एक विशेष पथक फरार झालेल्या गोतस्करानां पकडण्यासाठी रवाना करण्यात आले असून, या घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत व त्यांचे सहकारी करत आहेत. गोतस्करीतील अटक करण्यात आलेल्या आरोपीना पोलिसांनी रविवारी हिमायतनगर न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महोदयांनी त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. या तीन दिवसात पोलीस कस्टडीच्या दरम्यान गोतस्करीच्या कारभारातील फरार आरोपींच्या शोधासह गोतस्करीच्या धंद्यात सामील असलेल्या मुख्य आरोपीचा तपास लावण्यात पोलिसांना मदत मिळणार आहे.