नांदेड| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रकल्पांचे आज भूमिपूजन केले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुख्य कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष विकासकामांच्या ठिकाणी उपस्थित राहून भूमिपूजन केले.
याप्रसंगी कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर,जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती.
यामध्ये हनुमान गड परिसरातील राजमाता जिजाऊ सृष्टीचे लोकार्पण. कुसुम सभागृहासमोर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमीपूजन. पावडे वाडी नाका परिसरातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन.
नांदेड येथील वाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे तसेच परिचारिका वसतिगृहाचे भूमीपूजन. पिपल्स व सायन्स कॉलेज परिसरातील कै. नरहर कुरूंदकर यांचे नांदेड येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या बांधकामाचे भूमीपूजन. यासह लेबर कॉलनीतील पाणी पुरवठा सक्षमीकरण व बळकटीकरणाचे भूमीपूजन यासह शहरातील शेतकरी चौक, तरोडा नाका येथे विविध रस्त्यांसाठी भूसंपादनासह सुधारणा आदी कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी केले.