अर्धापूर| शिक्षण हे माणसाचे जीवन सुधारण्याचे शस्त्र आहे. एखाद्याचे जीवन बदलण्याचे हे कदाचित सर्वात महत्त्वाचे साधन आहे. मुलांचे शिक्षण घरापासून सुरु होते. शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता निश्चितच ठरवते. शिक्षणामुळे व्यक्तीचे ज्ञान, कौशल्ये सुधारते असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. तालुक्यातील निमगाव येथे दि. 29 ऑगस्ट गुरुवार रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मातंग संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भारत खडसे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप तर लसाकमचे महाराष्ट्र सचिव गुणवंत काळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, काँग्रेसचे जिल्हा सचिव पंजाबराव चव्हाण, साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर कदम, सुर्यवंशी, माजी सभापती पद्मावती घोरपडे, सरपंच संजय मोळके, पोलीस पाटील कान्होजी मोळके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गंगाराम झुडपे, माजी सरपंच संजय जाधव, उपसरपंच वसंतराव चव्हाण, भीमराव धोंगडे, मुख्याध्यापक जी.पी. सुर्यवंशी, तानाजी कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी साईनाथ दत्तराव कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघाच्या हदगाव तालुकाध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष भारत खडसे यांनी नियुक्ती केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करुन ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचे जयंती समितीकडून शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात भारत खडसे म्हणाले की, महामानवांचे कार्य सर्व जातीधर्मासाठी असते. समाजाने चांगल्या मार्गाने जाऊन आनंदी जीवन जगावे. तानाजी दत्ताराव कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन दिगंबर मोळके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष खंडू कांबळे, नालाजी धोंगडे, एकनाथ कांबळे, सुरेश कांबळे, आकाश धोंगडे, बिभीषण कांबळे, मारोती धोंगडे आदींनी परिश्रम घेतले.